भवरखेडे, विवरे विद्यालयात पालक मेळावा संपन्न

शिक्षक-पालक समन्वयातून समृद्ध शाळा व चांगले विद्यार्थी घडविण्यात मदत होईल.[अध्यक्ष डॉ.शांताराम पाटील].
धरणगाव प्रतिनिधी / अजय बाविस्कर
धरणगाव : तालुक्यातील माध्यमिक विद्यालय भवरखेडे, विवरे येथिल विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावी वर्गाचा पालक मेळावा उत्साहात पार पडला. सुरुवातीला अध्यक्ष व सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शांताराम दाजीबा पाटील उपस्थित होते.मेळाव्यात सर्व शिक्षकांनी विद्यार्थी लाभाच्या योजना, शाळेच्या भौतिक सुविधा, विद्यार्थी उपस्थिती, नियमित गृहपाठ करणे, इंग्रजी वाचन, दरमहा सर्व विषयाची सराव चाचणी,शैक्षणिक गुणवत्तावाढी संदर्भात पालकांना परिपुर्ण मार्गदर्शन केले. संस्थापक डॉ.शांताराम पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पालकांनी आपल्या पाल्याकडे नियमित लक्ष देवून दररोज शाळेत पाठवावे. पाल्य घरी आल्यावर अभ्यास करतो किंवा नाही हे पहावे. शिक्षक पालक समन्वयातून समृद्ध शाळा विद्यार्थी घडतील तसेच शाळेच्या भौतिक सुविधा पुर्ण करण्यासाठी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी भवरखेडे गावाचे सुपुत्र सध्या दमन येथे वास्तव्यास असलेले पांडुरंग पाटील यांनी देखील सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला व विद्यार्थ्यांना चांगल्या अभ्यासासाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी मुख्याध्यापिका सोनल पाटील,शिक्षक समाधान पाटील,स्वप्निल पवार,राजेश ठाकरे,पंकज ठाकरे,सविता पाटील,अनिता पाटील,सुनीता लोहार शिक्षकेतर कर्मचारी गणेश पाटील,अजय बाविस्कर,मयूर पाटील व गावातील सर्व पालक वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.