महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत संजय पवार व रोहित निकम यांची बिनविरोध निवड
जळगांव – महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ म्हणजेच मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत संजय पवार यांची पुन्हा बिनविरोध निवड तर रोहित निकम यांची देखिल बिनविरोध निवड झाली आहे. संजय पवार यांच्या निवडीने राज्यावर देखील बिनविरोधची पकड घट्ट झाली आहे.
दोघेही मित्र दूध संघाप्रमाणेच राज्य मार्केटिंग फेडरेशन येथे देखील सोबत आल्याचे बघावयास मिळत आहे. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी अखेरीस दोघांची निवड झाली आहे. सात ते आठ महिन्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शासनाने या निवडणुकीला स्थगिती दिली होती. अखेर स्थगिती उठल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आणि माघारीच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीशजी महाजन साहेब, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील साहेब, जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल दादा पाटील तसेच जळगाव जिल्ह्याचे तरुण आणि तडफदार आमदार मंगेश दादा चव्हाण, आमदार संजयजी सावकारे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली आणि नाशिक विभागातून म्हणजेच जळगाव, धुळे, नंदुरबार नाशिक, अहमदनगर या पाच जिल्ह्यातून जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन भाऊसाहेब संजय जी पवार तसेच भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष व जळगाव दूध संघाचे संचालक रोहित निकम यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीसाठी नाशिक येथील अपूर्व दादा हिरे, राजेंद्र दादा ढोकळे, येवल्याचे शाहू पाटील, अहमदनगरचे युवराज तनपुरे, श्रीगोंद्याचे दत्ताजी पानसरे व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते संजय दादा गरुड, नंदुरबार येथील संजीव रघुवंशी या मान्यवरांनी वरील नेत्यांच्या विनंतीवरून आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
उमेदवारी मागे घेतलेल्या सर्व उमेदवारांचे व वरिष्ठ नेत्यांचे श्री पवार व निकम यांनी आभार मानलेत. महिनाभरापूर्वी महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या महाराष्ट्र राज्याच्या जळगाव विभागातून म्हणजेच जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार या विभागातून देखील भाऊसाहेब संजय जी पवार यांची कापूस उत्पादक पणन महासंघात विभागीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली होती. आणि आज देखील पुन्हा श्री पवार व निकम यांनी जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. श्री संजय पवार हे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच कापूस उत्पादक पणन महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन या लागोपाठ तीन निवडणुकीमध्ये बिनविरोधची परंपरा त्यांनी राज्यावर देखील कायम ठेवली आहे. नामदार गिरीश भाऊ महाजन, नामदार गुलाबराव जी पाटील, जळगाव जिल्ह्याचे चाळीसगाव चे तरुण तडफदार आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या नेतृत्वात दूध संघात सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले होते.
संजय पवार यांनी आपले मित्र रोहित निकम यांच्यासाठी स्वतःची उमेदवारी न करता पत्नीची उमेदवारी दाखल केली होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांनी मात्र संजय पवार यांना निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याने त्यांनी या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली व आपले राजकीय कौशल्य दाखवून स्वतः व रोहित निकम असे दोघं बिनविरोध विजयी झाले. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन देखील होत आहे. श्री रोहित निकम यांच्या आई श्रीमती शैलजा देवी निकम यांनी यापूर्वी मार्केटिंग फेडरेशन मध्ये अनेक वर्ष संचालक व उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे रोहित निकम यांना देखील सहकार क्षेत्रामध्ये घराण्याचा वारसा असल्या कारणाने त्यांनी देखील आता राज्यावर आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे.