ताज्या बातम्या

सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेने कालवले धरणगावच्या रस्त्यांमध्ये विष

[ धरणगाव प्रतिनिधी गौतम गजरे ]

धरणगाव : शहरातील प्रत्येक भागात मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेची पूर्तता अद्यापही होत नाहीये परंतु रस्त्यांची मात्र संपूर्ण गावात दुर्दशा झालेली दिसून येत आहे.

सद्यस्थितीत शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. कामाची जेव्हा सुरवात झाली तेव्हा असं सांगितलं गेलं होतं की, जेवढी पाईपलाईन टाकली जाईल तेवढाच रस्ता कोरला जाईल परंतु इथे तर आज सर्वदूर रस्ते कोरून ठेवले आहेत. पेव्हर ब्लॉक बसवण्याची योजना साधारणपणे जिथे चौक असेल किंवा मोकळी जागा असेल तिथे लावले जातात परंतु धरणगावात तर काँक्रीट तसेच डांबरी रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसवले गेले आहेत. जिथे ब्लॉक सैल झाले तिथे मोटारसायकलस्वार गाडीवरून स्लिप होवून पडण्याचा घटना दररोज घडतात. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांना योग्य उतार न दिल्याने दूधाची वाटप करणारे किंवा इतर अवजड गोष्टींची वाहतूक करणाऱ्या लोकांची अवस्था बिकट होते. दररोज अपघात होतात परंतु बोलायला कोणीच तयार नाही. अमृत योजनेचे पाणी कधी मिळेल माहीत नाही कारण नियमितपणे पाईपलाईन ची चेकिंग होते आणि दररोज कुठे न कुठे पाईपलाईन फुटलेली दिसून येते. आबालवृद्ध लोकांची परिस्थिती काही वेगळी नाहीये, रस्त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेता जीविताला धोका निर्माण झालेला आहे.

भारत देश प्रचंड वेगाने प्रगती करतोय. कालपर्यंत आपण ज्या रेल्वेला मामाची गाडी म्हणत होतो ती अदानीची केव्हा झाली ते कळले सुध्दा नाही. मंगळावर आणि चंद्रावर पाण्याचा शोध घेणं सुरू असतांना धरणगावात मात्र १२ ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. युवकांचे लग्न जमत नाहीत, “तुमना गावमा पानी येत नही, म्हणीसन आम्ही पोरगी देणार नही” असं बोलून सगेसोयरे हिणवतात. या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करता अनेक गोष्टींचा उहापोह करता येईल. परंतु आज अगदी प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट हिच की, धरणगाव शहरात राबविल्या जाणाऱ्या योजनेने शहरातील रस्त्यांमध्ये विष कालवले हे सत्य स्वीकारले पाहिजे. समस्यांची प्रचिती सर्वांना येते परंतु सर्वसामान्य व्यक्ती बोलण्याची हिम्मत करत नाही. निवडणूका आल्यानंतर आश्वासनांचा पुन्हा पाऊस पडेल परंतु जनतेला कधीतरी न्याय मिळेल का? नियमितपणे पाणीपुरवठा होईल का? गावातील रस्ते चांगले नाही निदान चालण्यालायक तरी होतील का? असे एक ना अनेक प्रश्न धरणगावकर जनता विचारत आहे. या प्रश्नांची दखल घेऊन शासन दरबारी त्यांची उकल व्हावी एवढीच माफ़क अपेक्षा. लेखनप्रपंच – लक्ष्मणराव पाटील (एक सामान्य धरणगावकर नागरिक तथा कार्याध्यक्ष-संभाजी ब्रिगेड जळगाव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *