ताज्या बातम्या

सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी सामूहिक हवनाने पावन झालेला मुंदडा इस्टेट नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा!

अमळनेर प्रतिनिधी / संतोष पाटील — धर्म, भक्ती आणि राष्ट्रसेवेचा अनोखा संगम ठरलेला श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अमळनेर शहरातील मुंदडा इस्टेट, गलवाडे रोड येथे दिनांक १२, १३ व १४ मे २०२५ रोजी अत्यंत उत्साहात, भक्तिभावाने आणि एकात्मतेने साजरा करण्यात आला. धार्मिक पूजनविधी, मिरवणूक, विविध संस्कार आणि महाप्रसाद यांसह या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या वीर जवानांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी करण्यात आलेले सामूहिक महामृत्युंजय हवन, सरस्वती हवन आणि महाकाल हवन. या पवित्र यज्ञकुंडासमोर नागरिक, सैनिकांचे कुटुंबीय, महिला भगिनी, बालगोपाळ आणि ज्येष्ठ मंडळी एकत्र आले. मंत्रोच्चारांच्या गजरात सैनिकांच्या नावाने आहुती दिल्या गेल्या. सैनिकांच्या कल्याणासाठी अशा सामूहिक प्रार्थना आणि धार्मिक विधी प्रथमच घडत असल्याने परिसरात विशेष भारावलेले वातावरण अनुभवायला मिळाले. हवन विधीमध्ये सैनिकांच्या पत्नी व नातेवाईकांचा पुढाकार विशेष उल्लेखनीय ठरला. देशासाठी लढणाऱ्या वीरांचा सन्मान करीत त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करताना अनेकांच्या डोळ्यांत श्रद्धेचे अश्रू तरळले. “देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या वीरांची सुरक्षितता आणि सुखसमृद्धी आमच्या पूजेमधून मागतोय,” असे भावनिक उद्गार अनेक भाविकांनी यावेळी व्यक्त केले. या सोहळ्याला खान्देशभूषण श्री ओमप्रकाजी मुंदडा व युवकांचे बिझनेस आयकॉन श्री अमेयजी मुंदडा यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. मंदिर बांधकामासाठी बांधकाम अभियंता श्री निश्चयजी अग्रवाल व त्यांच्या टीमचे योगदान उल्लेखनीय ठरले.*मिरवणुकीत डीजेच्या तालावर टाळ मृदंगाचा गजर, रांगोळ्या, फुलांची सजावट, आणि पूजन विधीने वातावरण भक्तिमय झाले होते. महाप्रसादाला भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.विशेष म्हणजे हवनाच्या निमित्ताने देशभक्तीचे संस्कार रुजवण्याचा हा प्रयत्न भाविकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला.सैनिकांसाठी अशा धार्मिक उपक्रमांचे आयोजन ही काळाची गरज असून, प्रत्येक समाजाने राष्ट्रसेवकांसाठी या पद्धतीने सदिच्छा व्यक्त कराव्यात, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संदेश पाटील, अनिकेत देशमुख, मनोज शिंदे, भूषण उपासनी, जिजाबराव शिसोदे, गणेश शिंगारे, गिरधर पाटील, विशाल सूर्यवंशी, दीपक सोनावणे, अनिल पवार, आर. एस. पाटील, विजय चौधरी, राजेश पाटील, सुभाष पाटील, ऋषिकेश पाटील, रितेश विसपुते, योगेश चौधरी, विजय साळुंखे, प्रकाश पाटील, जितेंद्र चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.धर्म, संस्कृती आणि राष्ट्रप्रेमाचा संगम असलेल्या या सोहळ्याने परिसरात पवित्रता आणि एकात्मतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *