स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य, पालिका प्रशासन सुस्त

धरणगाव प्रतिनिधी विनोद रोकडे
धरणगाव — येथील स्मशानभूमीत पसरलेले घाणीचे साम्राज्य, वाढलेले गवत, मोकाट कुत्र्यांचा उच्छाद यामुळे नागरिक त्रस्त आणि नगरपालिका प्रशासन सुस्त, अशी गत झालेली दिसून येतेय.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील ध.न.पा.केच्या अंतर्गत असलेल्या चार स्मशानभूमी आहेत. त्यात सोनवद रोडवरील स्मशानभूमीचे नव्वद लाखाचे काम असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूस असलेल्या स्मशानभूमीचे एक कोटी पेक्षा अधिक कामे सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत झाली आहेत. तसेच ह्या दोन्ही स्मशानभूमीत निम्मेपेक्षा अधिक गावातील नागरीक अंतिम संस्कारासाठी येत असतात. सर्व जाती – धर्मातील लोकांचा या स्मशानभूमीत बाहेर गावातील नागरीक देखील मोठ्या संख्येने येत असतात परंतु तेथील वर्तमान परीस्थीतील घाणीचे साम्राज्य पाहून मोठी चिड निर्माण होते. तरी या सर्व बाबींकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून संताप व्यक्त केला जात आहे. करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या स्मशानभूमीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून तेथील साफसफाई व पावसामुळे उगवलेले गवत व प्रेतावरील कपड्यांचा ढीग पाहून तेथे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत असते. शिवाय रात्री बे रात्री प्रेतयात्रेत आलेल्या नागरीकांना सर्प, विंचू व इतर प्राण्यांच्या भितीने येण्यास घाबरतात तरी पालिका प्रशासने साफसफाई करुन व गवतावर तणनाशक फवारणी करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे. यासोबतच गावात भटक्या कुत्र्यांची समस्या मोठी गंभीर होत चाललेली आहे. कुत्र्यांच्या भुंकण्याचा त्रास एवढा वाढलेला आहे की नागरिकांना सुखाची झोप लागत नाहीये. पालिकेमार्फत होणारा अशुद्ध पाणीपुरवठा, गावातील ठिकठिकाणी पसरलेले घाणीचे साम्राज्य (कोट बाजार, धरणी परिसर इ.) याकडे पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच संतप्त नागरिकांचा धडक मोर्चा पालिकेवर आणण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी दिला.