स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आदिवासी ; नृत्य कार्यक्रमाने साजरा
औरंगाबाद : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी बांधवांसोबत आदिवासी नृत्य कार्यक्रमाने कन्नड येथील डी.डी.एल. लॉन्स येथे साजरा करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी, जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड,पोलीस उपअधीक्षक मुकूंद आघाव, तालुका कृषी अधिकारी बाळकृष्ण मुळक, आदिवासी समाजाचे अभ्यासक डॉ. रमेश सुर्यवंशी, समाजसेवक बद्रीनाथ कतारे, विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी मुख्याध्यापक, गृहप्रमुख, गृहपाल, कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत दोन गटामध्ये विविध आदिवासी समूहांनी सहभाग नोंदविला. शालेय गटायामध्ये आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळांमधील आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. तर वरिष्ठ गटात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे विविध कलागुण, परंपरा, प्रथा, वेशभूषा, गीत प्रकार, समूहनृत्य, नागरिकांस पाहण्यास व अनुभवायला मिळाले, या कार्यक्रमातून आदिवासी संस्कृती, जीवन पद्धती याविषयी ओळख करुन देण्यात आली.
प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी स्पर्धेतील सहभागी आदिवासी समाज बांधवासोबत पारंपरिक नृत्य केले व उपस्थित अधिकारी व कर्मचारी, मुख्याध्यापक या सर्वांनी पथकासोबत ठेका धरला. सामुहिक नृत्यामधून आदिवासी प्रकल्प अधिकारी व कर्मचारी यांनी आदिवासी समाजामध्ये एक सकारात्मक ऊर्जेची पेरणी केली. कार्यक्रमाची सांगता मान्यवराच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायनाने झाली.