आर्वीत निघाला शिवसन्मान मोर्चा ; शिवप्रेमींचा उदंड प्रतिसाद
प्रतिनिधि – अर्पित वाहाणे
वर्धा – आर्वी येथे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अक्षम्य अवमानाच्या विरोधात आर्वी शहरामध्ये शिवसन्मान मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावखेड्यातून शेकडो शिवप्रेमी मोर्चा मध्ये सहभागी झाले होते. स्थानिक विश्रामगृह आर्वी येथून या मोर्चा ची सुरुवात झाली. त्यानंतर आर्वी शहरातून हा शिवसन्मान मोर्चा निघत शिवप्रेमींनी तहसीलदार हरीश काळे यांना निवेदन दिले.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून समारोपीय सभा संपन्न झाली. सभेची प्रस्तावना रोहन हिवाळे यांनी केली. त्यांनतर संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष प्रफुल क्षिरसागर, दशरथ जाधव, चंद्रशेखर जोरे, गोपाल मरस्कोले, रुपचंद टोपले, प्रदीप मेंढे, प्रिया शिंदे आदींची भाषणे झाली.
मोर्चाला संबोधित करतांना संभाजी ब्रिगेड चे प्रदेश संघटक तुषार उमाळे यांनी सरकारला धारेवर धरले. तर प्रफुल क्षिरसागर यांनी दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करत येत्या काळात जनआंदोलन उभं करण्याचा इशारा दिला. यावेळी निवेदनाच्या माध्यमातून खालील मागण्या करण्यात आल्यात.
१)शिल्पकार जयदीप आपटे आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत.
२)मुंबईला अरबी समुद्रालगत जमिनीवरच भव्य दिव्य शिवस्मारक व्हावे.
३)छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी.
४)महाराष्ट्रातील वाढत्या स्त्री अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी तात्काळ स्त्री संरक्षणासाठी ‘शक्ती कायदा’ करण्यात यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी.
वरील मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभं केलं जाईल. असा इशारा शिवप्रेमींनी दिला. मोर्चा मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.