कन्हैयालाल महाराज यात्रेनिमित्त साक्री आगारातून जादा बसेस ची व्यवस्था : आगार व्यवस्थापक
साक्री (अकिल शहा): लाखों भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आमळी येथील दीपोत्सवानंतर कार्तिकी एकादशीला होणाऱ्या भगवान कन्हैयालाल महाराज यात्रा उत्सव गुरुवार दि. २३ नोव्हेंबर २०२३ पासून सुरु होत आहे .
मंदिरातील मूर्ती ही अखंड पाषाणाचे असून या विष्णू भगवान यांच्या मूर्तीच्या बेंबीतून सतत पाणी पाझरत असते. ही मूर्ती डाकोर येथून मुल्हेर येथे घेऊन जात असताना सेवेकर्यांनी येथील चाफ्याच्या झाडाजवळ ठेवून विश्रांती घेतल्यामुळे नंतर या ठिकाणाहून ही मूर्ती उचलली गेली नाही. त्यामुळे येथेच मंदिर बांधून आज कन्हैयालाल महाराज मंदिर म्हणून नावारूपाला आल्याची आख्यायिका आहे. येथे हजारो भाविक आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर नवस फेडण्यासाठी येत असतात.या यात्रेत राज्यासह परराज्यातील व्यापारी व भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून राज्य परिवहन महमंडळातर्फे साक्री आगारातून जादा बसेस सोडण्यात येत आहे व प्रवासी संख्या लक्षात घेऊन बसेसच्या फेऱ्या ही वाढवण्यात येतील अशी माहिती साक्री आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. किशोर अहिरराव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.