ताज्या बातम्या

‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’  काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला !

नाशिक दाढेगांव : येथील वालदेवी नदी पुलावरून पुराचे पाणी वेगाने वाहत असतानाही पुलावरील वाहत्या पाण्यातून दुचाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न युवकाच्या चांगलाच जिवावर बेतला. सुदैवाने नशीब बलवत्तर म्हणून या युवकाचे प्राण वाचले. मात्र, दुचाकी वाहून गेली.

दाढेगांव येथील रोशन वसंत गवळी हा रविवारी (दि.१८) संध्याकाळी ६ ते ७ च्या सुमारास आपल्या बुलेट दुचाकीवरून पाथर्डी मार्गे नदीपलीकडील दाढेगांव येथे त्यांच्या घरी जात होते. पुलावरील पाण्यातून जात असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने मोटारसायकलवरील त्यांचे नियंत्रण सुटून  मोटारसायकल पुराच्या पाण्यात वाहून गेली. यावेळी हातातील दुचाकी सोडून देत त्यांनी कसाबसा आपला जीव वाचवला, काळजाचा ठोका चुकविणारे हे दृश्य पाहत असलेल्या काही तरुणांनी मोठ्या हिमतीने या युवकापर्यंत जाऊन त्यास घरी आणले .

दरम्यान, वालदेवी धरणाच्या क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने वालदेवी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढतच असून, दाढेगांव ग्रामस्थांच्या वतीने वेळोवेळी सतर्कतेचा इशारा देत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. सदरील युवकाची बुलेट दुचाकी दि, १९ ऑगस्ट २४ रोजी सकाळी ८:३० वाजता गावातील बाळासाहेब उबाळे, किरण कोंबडे, समाधान जाधव या युवकांनी वालदेवी नदीपात्रातून बाहेर काढली आहे.

सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सागर पोपटराव भालके यांनी वारंवार येथील वालदेवी पुलाची उंची वाढविण्यासंदर्भात विविध दैनिकाच्या माध्यमातून ह्या विषयाला वाचा फोडुनही लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात दाढेगांव येथील वालदेवी पुलाच्या पुरामुळे जिवितहानी होते. येथील नागरिकांचे, कामगार वर्गाचे, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होतात, लवकरात लवकर या पुलाचे काम सुरू करावे, अन्यथा मोठे जनआंदोलन उभारु असा इशारा सागर भालके यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *