कोळी जमातीसाठी अन्नत्याग सत्याग्रहाचे ‘ते’ सव्वीस दिवस जीवन मरणाचे : जगन्नाथ बाविस्कर
हा राजकीय ‘स्टंट’ नसुन सामाजिक इव्हेंट होता : जगन्नाथ बाविस्कर
प्रतिनिधी-विनायक पाटील
जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीला कोळी नोंद सामाजिक दर्जानुसार सुलभपणे जात व वैधता प्रमाणपत्र मिळावीत, यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर(चोपडा) यांचेसह संजय कांडेलकर, नितीन कांडेलकर (मुक्ताईनगर), पुंडलीक सोनवणे (भोकर), नितीन सपकाळे (अंजाळे), पद्माकर कोळी (डोंगरकठोरा), सौ.सुनिता कोळी (गाते-रावेर), सौ.पुष्पा कोळी (बुलढाणा) यांनी दि. १० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान एकूण २६ दिवसांचा तीव्र अन्नत्याग सत्याग्रह केला. कोळी समाजाच्या न्याय व हक्कांसाठी केलेला अन्नत्याग सत्याग्रह हा काहिंना राजकीय स्टंट वाटला परंतु तो आमचा सामाजिक इव्हेंट होता. ‘ते’ २६ दिवस आमच्यासाठी पारिवारीक, शारिरीक, मानसिक, सामाजिक जीवनमरणाचे होते, अशी स्पष्टोक्ती महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (चोपडा) यांनी ह्या पत्रकांन्वये केली आहे. याआधीही सामा.कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी अमळनेर व चोपडा प्रांत कार्यालयासमोर अनुक्रमे ५ व ६ दिवसांचा तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करून शेकडों टोकरेकोळीचे दाखले मिळवुन दिलेले होते. परंतु इतर प्रांतांकडून अडवणुक होत असल्याने आदिवासी कोळी समाज समन्वय समितीने जळगाव येथे कोळी समाजाचा एल्गार पुकारून तीव्र उपोषणाचे हत्यार उपसले होते. याठिकाणी महाराष्ट्रातील हज्जारों समाजबांधवांनी प्रत्यक्ष येऊन पाठिंबा दर्शविला. जिल्ह्यातील सर्वच आजी-माजी आमदार खासदार मंत्री व सर्वपक्षीय / सामा. संस्था संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. राज्यस्तरावरील मागण्यांसाठी खुद्द मुख्यमंत्री यांचेशी समन्वय समितीची दोन वेळेस बैठक होऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी दोन महिन्यांचा अल्टिमेट सांगीतलेला आहे. तत्पूर्वी प्रत्येक प्रांतांकडे प्रलंबित असलेली प्रकरणे तपासून लाभार्थ्यांना दाखले द्यावेत अशाही सुचना आहेत. जिल्ह्यातील राजकिय, पक्षीय व सामाजिक श्रेयवादामुळे २६ दिवस अन्नत्याग सत्याग्रह सुरू होता. मध्यंतरीच्या काळात सर्वच नेत्यांनी याकडे पाठ फिरवल्यामुळे कोळी समाजाने उग्ररूप धारण केले होते. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडत होती. परंतु याप्रसंगी कोणतेच गालबोट न लागता कायदा, शांतता व सुव्यवस्था राखून हे आंदोलन यशस्वी झाल्याने कोळी समाजाबद्दल सर्वस्तरातुन गौरवोद्गार काढले जात आहेत. यासाठी समन्वय समितीसह पोलीस, आरोग्य, महसुल विभागाचे विशेष सहकार्य लाभले.
महाराष्ट्रातील कोळी समाजाचा बालेकिल्ला…जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रातील अखिल कोळी समाजाचा बालेकिल्ला समजला जातो. येथील उपोषणास प्रत्येक जिल्ह्यातील कोळी समाजबांधवांनी हजेरी लावून त्या त्या ठिकाणी आंदोलने उभारली आहेत. जर शासन प्रशासनाने दोन महिन्यात आमचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी बेमुदत तीव्र उपोषण आंदोलने छेडण्यात येतील. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील समाज संघटनांनी सज्ज राहावे..
जगन्नाथ बाविस्कर (उपोषणकर्ते), (संपर्कप्रमुख- म.वाल्मिकी समाज मंडळ, चोपडा)