ताज्या बातम्या

गुलाबराव देवकर हे पक्षाला घातक आहेत : राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन यांचा गंभीर आरोप

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा अंतर्गत कलह पुन्हा आला समोर

जळगांव – घरात मुलाचे लग्न असल्यामुळे मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत आम्ही मतदारांपर्यंत पोहचू शकलो नाही. त्यामुळे प्रचाराला वेळ मिळाला नाही. म्हणून अनामत जप्त झाली. मात्र आम्ही प्रचार केला असता तर निश्चितच आमचा विजय झाला असता असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते तथा धरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी धरणगाव येथील त्यांच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

नुकतेच १२ मार्च रोजी जळगाव जिल्हा मजुर फेडरेशनची निवडणूक पार पडली. मागील २५-३० वर्षांपासुन फेडरेशनवर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची एकतर्फी सत्ता आहे. तसेच २५-३० वर्षांपासुन याठिकाणी निवडणूक देखील पार पडलेली नाही. मागील वेळी मी इच्छुक होतो. परंतु देवकर यांच्या आग्रहाखातर आम्ही माघार घेतली. परंतु त्यावेळी माघार घेतल्याची परतफेड म्हणून यावेळेला आम्हाला संधी मिळेल अशी आशा होती. मात्र देवकर यांनी आमचा प्रस्ताव धुडकावुन लावला. त्यामुळे आम्ही निवडणुकीतून माघार घेतली नाही. मात्र माझ्या मुलाचे लग्न आणि फेडरेशन ची निवडणुक एकाच दिवशी आल्यामुळे आम्हाला प्रचार करता आला नाही. इतकेच नव्हे तर आम्हाला स्वतःला देखील मतदानाला जाता आले नाही व आम्हाला विजयी होता आले नाही. अन्यथा आमचा विजय निश्चित होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

या संस्थेत गुलाबराव देवकर यांची एकतर्फी हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी मी प्रत्येक निवडणुकीत अर्ज करीत असतो. गेल्या २५ ते ३० वर्षांपासुन याठिकाणी मी सभासद आहे. हुजुरेगिरी करणाऱ्यांना कामे दिली जातात. कामांचे समान वाटप केले जावे सर्वाना न्याय मिळावा यासाठीच माझा हा प्रयत्न आहे. गेल्या २५-३० वर्षांपासूनची हुकुमशाही आज मी मोडीत काढली आहे व यामुळे मतदारांना मतदानाचा हक्क बजावीता आला आहे. माझी अनामत जप्त झाल्याच्या बातम्या काही प्रसार माध्यमांनी प्रसारित केल्या होत्या. परंतु असे काहीही नाही. आमचा विजय निश्चित होता. असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

गुलाबराव देवकर हे पक्षाला घातक आहेत. असा गंभीर आरोप देखील ज्ञानेश्वर महाजन यांनी केला आहे. माझी त्यांना अडचण होत असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून जाणीव झाली आहे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला डावलले जाते. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

या सर्व घडामोडी पाहता जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा अंतर्गत कलह एकदा पुन्हा समोर आला असल्याचे दिसून आले. एकीकडे ज्ञानेश्वर महाजन यांचा वारंवार होत असलेला बंड, देवाकारांच्या विरोधातील भुमिका तर दुसरीकडे गुलाबराव देवकर, सर्व काही आलबेल असल्याचे सांगत असतात. मात्र पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा अंतर्गत कलह समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *