ताज्या बातम्या

घरात अठरा विश्व दारिद्र्य अन् मुलगा बेडवर असताना नागाच्या दंशात सावखेडा येथील महिलेचा मृत्यू

प्रतिनिधी- चोपडा तालुका/विनायक पाटील

चोपडा प्रतिनिधी – सकाळी लवकर उठून मंदिरात जाऊन पूजा केली, घराच्या शेजारी दुसऱ्या मंदिरात जाऊन पूजा केली. ज्योतही लावली आणि घरात परत आल्यानंतर कपाट उघडून कपडे घेण्यासाठी महिलेच्या हातावर नागाने दंश केला आणि त्यात सावखेडा तालुका अमळनेर येथील रहिवासी लताबाई ईश्वर कदम (वय 42) यांचा जीव गेला. घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना वीस ते बावीस वर्षाचा मुलगा शारीरिक आजाराने बेडवर खिळून पडलेला असताना व पती ईश्वर वसंत कदम हेही जेमतेम मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या परिवारावर काळाने झडप घातली. अतिशय गरीबीशी झुंज देणारा परिवार अखेर उघड्यावर आला. आता अंथरुणावर खिळून पडलेल्या मुलाचे कोण करेल? हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. श्रावण सोमवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजे च्या दरम्यान सावखेडा तालुका अमळनेर येथील लताबाई ईश्वर कदम यांनी पहाटे लवकर उठून गावातील मोठ्या महादेव मंदिरात पूजाअर्चा केली आणि घराशेजारी असलेल्या छोट्या मंदिरातही पूजा अर्चा करून ज्योत लावली आणि तिथून घरी परतल्या. कपाटात कपडे घेण्यासाठी गेले असता कपाटात नाग होता आणि त्या नागाने त्यांच्या मनगटावर दंश केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

श्रावण सोमवारच्या दिवशी पूजा आरक्षण करून नागाने दंश करणे त्यात त्यांचा जीव जाणे हा योगायोग म्हणावा लागेल. घटना घडल्यानंतर मयत लताबाई कदम यांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापूर्वी त्यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु त्या ठिकाणी मृत घोषित केल्यानंतर खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्या मृत ठरल्याचे जाहीर झाले. ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि चोपडा शहरातील सर्पमित्र संदीप मालचे आणि सागर बडगुजर यांनी सदर महिलेच्या हातावरील नागाने केलेल्या दंश पाहून त्यांनी सावखेडा येथील मयत महिला लताबाई कदम यांचे घर गाठले. गल्लीमध्ये आजूबाजूला काँक्रीटची घरे असताना यांचेच एक घर मातीचे होते आणि त्या घरात सर्वत्र सर्व मित्र संदीप मालचे व सागर बडगुजर यांनी उलथापालत केली तर घरातच नाग मिळून आला. नागास त्यांनी पकडला आणि बरणीत बंद करून त्याला जंगलामध्ये सोडण्यासाठी वनविभागाकडे हस्तांतरित केले .सोमवारच्या दिवशी लताबाई ईश्वर कदम यांचा नागाच्या दंशात जीव गेल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला होता. त्यातच घरात वीस ते बावीस वर्षे वयाचा मुलगा दीर्घ आजाराने अंथरुणाला खीळून पडलेला आहे. तर पती ईश्वर वसंत कदम हेही जेमतेमोल मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करतात. आता संघर्षमय जीवनातुन लताबाई ईश्वर कदम याही निघून गेलेल्या आहेत. मुलगा अंथरुणावर खिळून पडलेला आहे, त्याची जबाबदारी यापुढे कोण घेणार हा मोठा प्रश्न ईश्वर कदम यांच्यासमोर निर्माण झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *