जळगांव-सातपुड्यात ढगफुटी भोकर नदीला महापूर : रावेर-पुनखेडा-पातोंडी मुक्ताईनगर संपर्क तुटला
जळगाव उमेश कोळी (लोकनायक न्युज)
जळगांव – महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर सातपुडा पर्वतराजीत ढगफुटी झाल्याने भोकर नदीला महापूर आला असून यामुळे रावेर-पुनखेडा-पातोंडी आणि मुक्ताईनगर तालुक्याचा संपर्क तुटला आहे.तरी भोकर नदी ही गरताड गावाच्या मार्गाने रावेर तालुक्यात प्रवेश करते. तर विटवा गावाजवळ ही नदी तापीला जाऊन मिळते. दरम्यान, या नदीवर पातोंडी आणि पुनखेडा येथे दोन पूल आहेत. याच पुलांच्या माध्यमातून रावेर-पुनखेडा-पातोंडी आणि मुक्ताईनगरच्या दरम्यानची प्रमुख वाहतूक चालते. भोकरला आलेल्या महापुरामुळे या दोन्ही पुलांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या दोन्ही पुलांवर दोन्ही बाजूंनी पोलीस बंदोबस्त लाऊन बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत. यामुळे दोन्ही तालुक्यांमधील संपर्क तुटलेला आहे.दरम्यान, भोकरला महापूर आल्यामुळे परिसरातील अनेक शेतांमध्येही पाणी शिरले असून प्रशासन यावर लक्ष ठेवून आले. तहसीलदार बंडू कापसे आणि पोलीस निरिक्षक श्री. कैलास नागरे हे आपल्या सहकाऱ्यांसह सातीने या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तर पोलीस निरिक्षक हे सहकाऱ्यांसह पुलाजवळ आहेत.भोकर नदीला महापूर आल्याची माहिती मिळताच दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी केली आहे. या लोकांना पोलिसांनी आवर घातला आहे. तर रात्रीतून देखील अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने परिसरातील लोकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल्याचा अलर्ट जारी केला आहे.