ताज्या बातम्या

जळगाव : वायरमनचा तारांना चिकटून अपघाती मृत्यू

चोपडा प्रतिनिधी-विनायक पाटील

अन्य तीन भाजल्याने जखमी…

एमएसईबी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कंत्राटदार अन् शेतकऱ्यावर गुन्हा दाखल ..

वेळोदे शिवारातील घटना

तालुक्यातील वेळोदे शेत शिवारात शेतात ईलेक्ट्रीक तारांचे काम करीत असतांना शॉक लागून कंत्राटी वायरमन संदीप प्रकाश पाटील यांचा मृत्यू झाल्याने मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब कुटुंबियांवर संक्रांत आल्याने गावभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर अन्य तीन जण भाजून जखमी झाले आहेत. याप्रकरणी मयताचे भावाच्या फिर्यादीवरून शेत मालक, ईलेक्ट्रीकल कंत्राटदार तथा सुपरवायझर,एम एस इ बी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.विना परवाना सावळा कारभार एकाच्या जीवावर बेतल्याने संबंधित सब स्टेशनचा प्रकार चव्हाट्यावर आल्याचे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार,आज, दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सोपान बाबुराव पाटील राहणार मोहिदा यांच्या शेतातील शेती पंपासाठीची इलेक्ट्रिक लाईनचे तार ओढण्याचे कामा करीता इलेक्ट्रिक कंत्राटदार व सुपरवायझर दिनेश चौधरी यांनी तसेच शेतकरी सोपान बाबुराव पाटील व एम एस सी बी चे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारचे विद्युत सुरक्षा विषयक साहित्य न पुरविता वरून गेलेली मुख्य वीज वाहीनीतील वीजप्रवाह बंद करता समाधान रामकृष्ण पाटील अनवर्दे बुद्रुक, दिनेश विकास पाटील गणपुर, ज्ञानेश्वर भगवान पाटील अनवर्दे बुद्रुक व संदीप प्रकाश सोनवणे वेळोदे यांना कामास लावले. त्यांच्या या सदरच्या निष्काळजीपणामुळे संदीप प्रकाश सोनवणे हे इलेक्ट्रिक शॉक लागून मयत झाले तर दिनेश विकास पाटील समाधान रामकृष्ण पाटील, ज्ञानेश्वर पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात वासुदेव प्रकाश सोनवणे वय 27 धंदा रिक्षा चालक राहणार वेळोदे राहणार विरोधी यांच्या फिर्यादीवरून सीआरपीसी ०८/ २०२४ भांदवि कलम ३०४, ३३७ ,३३६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितनवरे हे करीत आहेत
संदीपचे जीवन लहानपणीच हलाखीचे
संदीप हा लहान असतांना आई-वडिलांचे छत्र हरवले आहे .दोन भावंडांना आजी आजोबांनी सहारा देऊन वाढविले आहे.वडील हे मुलांना सोडून तमाशा निघून गेलेले आहेत अत्यंत गरीब परिस्थितीतून जेमतेम पोटाची खळगी भरत असतांना काळाने आईला ही हिरावून नेले होते. “संदीप”ला परिसरात कोणीही फोन केला तरी अर्ध्या रात्री काम करणारा व्यक्ती अशी त्याची ओळख होती.त्याच्या मृत्यूची बातमी गावात येऊन धडकताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *