जिल्हाभरात सीसीआय मार्फत होणार कापुस खरेदी ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचे प्रयत्न

जळगांव – भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत एफएक्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरु होणार असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रावेर लोकसभा अंतर्गत १० ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरु करणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री यांना मागणी केली होती. परंतु रावेर लोकसभा अंतर्गत ४ कापूस खरेदी केंद्र धरून जळगांव जिल्ह्यात एकूण ११ केंद्र (पाचोरा, जळगांव, चाळीसगाव, एरंडोल, शेंदुर्णी, धरणगांव व पाचोरा) सुरु करण्यात येणार असल्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय कडून कळविण्यात आले आहे. तर रावेर लोकसभा अंतर्गत इतर ठिकाणी व बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा येथे कापूस हंगाम, उत्पादन ई. ची माहिती घेऊन कापूस खरेदी केंद्र सुरू करणे बाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
रावेर लोकसभा अंतर्गत जळगांव जिल्ह्यातील रावेर, सावदा, मुक्ताईनगर, यावल, जामनेर, भुसावळ, चोपडा व बोदवड तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा येथे भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र सुरु करणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री.गिरीराज सिंग यांना विनंती केली होती. त्यानुसार भारतीय कापूस महामंडळ जामनेर, भुसावळ, चोपडा व बोदवड या ४ ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरु करणार आहे.
आधी जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 200 ते 250 किमी दूर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील केंद्रांवर जावे लागत असे, आता जिल्ह्यात ११ कापूस खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक व मानसिक त्रास कमी होणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होऊन, समाधान व्यक्त करण्यात येत आहे.