महाराष्ट्र

दहिवेल-पिंपळनेर रस्त्याच्या कामासाठी दहीवेल येथे करण्यात आला रास्तारोको

साक्री (अकिल शहा) : दहिवेल विंचुर – प्रकाशा राज्य मार्गावरील दहिवेल पासून पिंपळनेर रस्त्यावर तीनशे मीटर काँक्रीट रस्त्याचे मंजुर काम गेल्या ७ महिन्यापासून रखडले आहे. हे काम पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी आज (दि.११) सकाळी १० वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले. याबाबत ग्रामस्थांनी साक्री पोलीस स्टेशनला निवेदन दिले होते.

दहिवेल पिंपळनेर – रस्त्यावर येथील मुस्लिम कब्रस्तानपासून कान नदीच्या पुलापर्यंत तीनशे मीटर काँक्रीटीकरणाचे काम मंजुर करण्यात आले होते. त्यात एका बाजुच्या रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे तर दुसऱ्या बाजुच्या रस्त्याचे काम ७ महिन्यापासून रखडले आहे. हा विचुर प्रकाशा राज्यमार्ग असल्यामुळे लहान मोठ्या वाहनांची वर्दळ असते. रस्त्याची दुसरी बाजु खोल असल्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत आहे. परिणामी लहान मोठे अपघात सातत्याने होत असतात. वेळोवेळी ग्रामपंचायत व स्थानिक नागरीकांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग पिंपळनेर येथील अभियंत्यांना निवेदन दिले. परंतु याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे रस्त्याचे काम करण्यात यावे, या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. याबाबत माजी उपसरपंच हिंम्मतराव बच्छाव, श्री भानुदास गांगुर्डे, वसंतराव बच्छाव, राजेंद्र बच्छाव,पुंजाराम चौधरी,हिम्मत बच्छाव, डाँ दिनेश मराठे, सुधीर मराठे, कनू माळी,भगवान चौधरी,संजय कलेश्वर, संदीप बच्छाव, प्रनेता देसले, पवन संदानशिव, आकाश बच्छाव यांनी अधिकारी कुवर रावसाहेब, ठेकेदार संदीप महाले यांना निवेदन दिले या वेळी  ठेकेदाराकडुन साईड पटटीवर भराव करुन दुहेरी वाहतुक वळविण्यात आलेली असुन दुस-या बाजुचे काम देखील सुरुवात करण्यात आलेली आहे, सदर काम हे ठेकेदाराकडून ३१/०१/२०२४ पर्यंत पूर्ण करुन घेण्यात येऊन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात येईल. असा लेखी खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभाग, पिंपळनेर  दि.११/१२/२०२३ रोजी लिहुन देण्यात आला आहे. या वेळी साक्री पोलीस स्टेशन चे पीएसआय रोशन निकम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *