धरणगावातील तोडे परिवाराने मुलीचा केला सत्यशोधक पद्धतीने विवाह !
सत्यशोधक पद्धतीने विवाह लावणे ही काळाची गरज : प्रा डी आर पाटील ( सहकार भारती राष्ट्रीय मंत्री )
धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगांव : येथील तोडे परिवाराने आपल्या मुलीचा सार्वजनीक सत्यधर्मीय पद्धतीनुसार सत्यशोधक विवाह लावुन राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने उजाळा देत समाजात एक नवा आदर्श निर्माण केला. ज्या महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांनी समाज परिवर्तनासाठी आपले आयुष्य वेचले मनुस्मृतीला मूठमाती देण्याचे काम केले, मात्र ज्यांना शिक्षणाचा अधिकार दिला तेच पेशवाईचे अनुकरण करत आहेत वैदिक लग्राच्या नावाने पेशवाईची घुसखोरी सुरू झाली आहे. लग्राचे आधी प्री – विडींग शूटिंगच्या नावाने विचित्र प्रथा सुरू झाली. राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचे पागोटे डोक्यावर घेण्याऐवजी पेशवाईची पगडी व ड्रेस घालून विचित्र प्रथा वाढू लागली आहे. एकाच दिवसात दोन वेळा लग्न लावणारी वर वधूंच्या माता-पितांना खाईत नेणारी हि प्रथा आहे. मात्र ओझर ता.चाळीसगाव येथील सौ.शोभा व बाबुलाल सुकदेव शिरसाठ ( वरिष्ठ सहाय्यक जिल्हा जलसंधारण विभाग जि.प. जळगांव ) यांचे सुपुत्र सत्यशोधक ललित व सौ.सुनिता व संजय भिमराव तोडे रा. धरणगाव जि.जळगांव यांच्या सुकन्या सत्यशोधिका रुपाली यांचा शनिवार दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी या सर्व घातक रूढी परंपरा झुगारून तेली समाज मंगल कार्यालयात सार्वजनिक सत्यधर्मीय सत्यशोधक पद्धतीने विवाह करून समाजात एक आदर्श निर्माण केला. या विवाहानिमित्त शिरसाठ परिवाराकडून सत्यशोधक समाज संघास पाच हजार रुपयांचा सहयोग निधी विधीकर्ते भगवान रोकडे, विलास माळी यांच्याकडे रितसर पावती घेऊन सुपूर्द केला. सदरील विवाह सोहळा खंडोबाची तळी भरून बेल भंडारा उधळत येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करण्यात आला. या वेळी विवाह मंचावर त.गौतम बुध्द, जगद्गुरु तुकोब्बाराय, राजमाता जिजाऊ, छ. शिवाजी महाराज, लोकमाता अहिल्यामाई होळकर, राष्ट्रपिता जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे, यांच्या प्रतिमांचे पूजन वधू-वर व त्याच्या माता-पित्यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण केले. तद्नंतर सार्वजनिक सत्यधर्माची सामूहिक प्रार्थना वाचन करण्यात आली. नंतर वधू-वरांनी एकमेकांना जीवनभर साथ देण्याची, तसेच निर्व्यसनी राहून कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्याची व सार्वजनिक सत्यधर्मीय विचार आचरणात आणण्याची शपथ घेतली, तद्नंतर राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले लिखित सत्यशोधक मंगलाष्टक गायन करून विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी धरणगांव येथील प्रा.दिलीप रामु पाटील ( सहकार भारती राष्ट्रीय मंत्री ), नायब तहसिलदार प्रथमेश मोहळ, छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाचे सरकारी वकील डी बी गायकवाड, प्रा.डॉ. अंबादास सगट थोर साहित्यिक आणि विचारवंत कन्नड, प्रा.डॉ.उदय जगताप (प्राचार्य कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव), अमोल पाटील (जिल्हा जलसंधारण अधिकारी जळगांव), उपविभागीय अधिकारी निरज भिमराव, विरवाडकर साहेब, कांबळे साहेब, संजय चव्हाण, समता सैनिक दलाचे धर्मभुषण बागुल, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा कार्यध्यक्ष कैलास जाधव, नगरसेवक रामचंद्र जाधव, आबा पहिलवान, ह.भ.प. महंत श्री सुरेश महाराज शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थिती विवाह सोहळा संपन्न झाला. खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांचे विचार आचरणात आणून शिरसाठ व तोडे परिवाराने समाजात एक नवा आदर्श निर्माण केला. या विवाहास सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, जलसंधारण, कृषी, शैक्षणिक, सांस्कृतिक व महसूल विभागातील असंख्य मान्यवरांनी उपस्थित राहुन या विवाहाचे कौतुक करत वधूवरांसह त्यांच्या माता पित्यांचे अभिनंदन केले. वधू वरांना विधीकर्ते भगवान रोकडे, विलास माळी आणि वधू-वरांच्या माता-पितांच्या हस्ते विवाहाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.