ताज्या बातम्या

धरणगाव नगर परिषदेच्या अभिनव उपक्रमांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

धरणगाव / विनोद रोकडे

प्रतिनिधी दि. 30- गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर धरणगाव नगर परिषदेच्या विविध अभिनव उपक्रमांचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी “नगर परिषदेच्या या अभिनव उपक्रमांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. प्लास्टिकमुक्ती आणि पुनर्वापराला चालना देणारे हे प्रकल्प राज्यासाठी प्रेरणादायी ठरतील,” असे गौरवोद्गार काढले. ते धरणागाव येथे नगरपरिषद तर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शहराच्या सौंदर्यीकरणासाठी उड्डाणपूल ते पारोळा नाका या मार्गावरील दुभाजकावर वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच, पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपयुक्तता वाढवणाऱ्या RRR सेंटर आणि “बर्तन बँक” या उपक्रमांचेही उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. नगर परिषदेने आपल्या उद्यानाजवळील इमारतीमध्ये सुरू केलेल्या RRR सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरातील न वापरली जाणारी कपडे, चप्पल, खेळणी, भांडी यांसारख्या वस्तू दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून त्या गरजूंपर्यंत पोहोचवता येतील.

बर्तन बँक ; प्लास्टिकच्या प्रदूषणाला पर्याय

“बर्तन बँक” उपक्रमामुळे शहरातील विवाह, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या पत्रावळी व ग्लासचा वापर कमी करून स्टीलची भांडी पुरविण्यात येणार आहेत. हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येत असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः ५०० ताटे व ग्लास देण्याचे जाहीर करून जनतेला या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले, तर सूत्रसंचालन कार्यालय अधीक्षक भिकन पारधी यांनी केले. याप्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख विलास महाजन, न. पा. चे माजी गटनेते पप्पू भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, संजय चौधरी बुटया पाटील, भानुदास विसावे, धिरेंद्र पुरभे – राजपुत, स्वच्छता निरीक्षक हैबतराव पाटील, कर निरीक्षक हितेश जोगी, विद्युत अभियंता राहुल तळेले,
यांच्यासह शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी नगरपरिषदेचे कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *