नाशिक : पोलिस मित्र परीवार समन्वय समितीचे चौथे अधिवेशन नाशिक मध्ये दिमाखात संपन्न
( मुक्त पत्रकार – संतोष शिंदे )
नाशिक : सर्वसामान्य लोकांना व त्यांच्या परिवारातील मुलांसह सर्वांना शिक्षण, आरोग्य तसेच अन्य सोई सुविधा तत्पर विनाशुल्क मिळाव्यात तसेच सामान्य जनतेचे अन्य सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पोलीस मित्र समन्वय समिति सन 2018 पासून अविरत कार्य करीत आहे.
समितीच्या अधिवेशनाची दीप प्रज्वलन तसेच भारत मातेची पूजा करून सुरवात झाली. यावेळी प्रमुख अतिथी स्वामी मुकेश महाराज, सौ.मंगला भंडारी, समितीचे संस्थापक डॉ.संघपाल उमरे, प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक सूरज बिजली, तसेच श्री.अहमद अन्सारी, ॲड.संतोष शिंदे, मनिप गुडदे, रेखा मनेरे, सुनील परदेशी, राहुल मोरे, विरेंद्र सिंग टिळेकर आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातून कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी व पाहुणे यांनी समाजातील उद्भवणाऱ्या प्रश्नांवर आपले विचार व्यक्त केले. यावेळी संस्थापक डॉ. उमरे यांनी समिती निस्वार्थी पणे कोणत्याही कोणाच्याही आर्थिक मदतीशिवाय आपले समाज कार्य स्वतःच्या पैशाने करीत आहे. आज काल शिक्षणाच्या संधी देखील गरीब घरातील मुलांना मिळत नाहीत. तसेच महीलावर होणाऱ्या अत्याचाराची वाढ आणि कुटुंबसंस्था देखील मोडकळीस येत असल्याने त्यासाठी आम्ही सर्वजण समितीच्या माध्यमातून कार्यरत राहणार असून प्रत्येक कॉलेजात जावून विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणण्याचे कार्य देखील व्याख्यानातून करणार असल्याचे डॉ.उमरे यांनी यावेळी सांगितले. समिती ही केवळ समिति नाही तर पोलीस मित्र, शासन मित्र, जन मित्र अशी तिहेरी भूमिका बजावत असल्याचे अहमद अन्सारी यांनी प्रतिपादन केले.यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांना सन्मान करून त्यांस प्रमुख पाहुणे, संस्थापक तसेच ॲड.संतोष शिंदे, पुणे आदींच्या हस्ते गौरविण्यात देखील आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमोल कदम यांनी केले तर आभार श्री. सुनील परदेशी यांनी मानले. अधिवेशनाची सांगता राष्ट्रगीताने झाली.