पालकांनी, नोकरी नाही तर छोकरी नाही, ही मानसिकता बदलायला हवी : मंत्री गुलाबराव पाटील
परीट समाजाच्या मेळाव्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन
भुसावळ – पवित्र अशा संविधान दिनी राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या विचारांवर चालणाऱ्या परीट् (धोबी) समाजाच्या सभागृहाचे लोकार्पण व परिचय मेळावा होणे प्रेरक आहे. असे मेळावे प्रत्येक समाजाची काळाची गरज आहे. कारण, आता मुलांना नव्हे तर मुलींना हुंडा द्यावा लागेल की काय अशी स्थिती आहे. मुलींचे प्रमाण कमी असल्याने कुटुंबीयांचा आग्रह नोकरी वाला जावई पाहिजे असा असतो. पण, नोकरी नाही तर छोकरी नाही, ही मानसिकता बदलावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. भुसावळ येथे महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ जळगाव व श्री संत गाडगे महाराज परीट (धोबी) सेवा संस्थेच्या नवीन सभागृहाचे लोकार्पण व वधू-वर परिचय मेळाव्यात ते बोलत होते.
प्रारंभी संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याचे मंत्री गुलाबराव पाटील, मुंबई येथील माजी न्यायमूर्ती किशोर सोनवणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजय सावकारे व समाजातील मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी अ.भा. धोबी महासमाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथ बोरसे, भुसावळ माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळ माजी प्रदेशाध्यक्ष विजयराव देसाई, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, मार्गदर्शक किसनराव जोर्वेकर, महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार मालविय, पुणे येथील माजी उपमहापौर सुरेशराव नाशिककर, संत गाडगेबाबा स्मारक बांधकाम समिती प्रदेशाध्यक्ष दिलीप शिंदे धरणगाव पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष विनोद रोकडे सह तसेच मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वधू वर परिचय मेळावा सतत सुरू रहावा म्हणून ५१००० रोख देणगी देऊन आयोजक यांचा उत्साह द्विगुणित केला तसेचधरणगाव येथील समाजाचे छोटू जाधव विनोद रोकडे रवी जाधव यांनी कार्यक्रमसाठी आवर्जून या असा आग्रह धरून मला या येण्याचे भाग्य लाभले असे मंत्री गुलाबराव पाटील गौरवउदगार केला यावेळी मंडळाचे जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी आमदार संजय सावकारे म्हणाले की, वधू-वर मेळावा घेतला म्हणजे समस्या संपल्या असे होत नाही. समाजाच्या समस्या शोधून त्यावर उपायांसाठी निरंतर काम करावे. व्यक्तीगत राजकीय विचार, पक्ष वेगळे असले तरी सर्वांनी समाजासाठी एकच विचार ठेवावा. छोटा समाज असला तरी आपली ताकद दाखवली पाहिजे. तरच तुमची किंमत होते. परीट समाजाची राज्यातील संख्या ३० लाखांवर आहे. ती कमी समजू नका. स्वतःला कमी लेखू नका. असे ते म्हणाले.