पीएम श्री केंद्रीय विद्यालय, उमवी जळगाव ची लोकमत वृत्तपत्र प्रिंटिंग प्रेसला अभ्यास भेट
जळगाव: संपूर्ण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वृत्तपत्र दैनिक लोकमत च्या प्रिंटिंग प्रेसला नुकतीच पीएम श्री केंद्रीय विद्यालय जळगाव च्या विद्यार्थ्यांनी अभ्यास भेट दिली. केंद्रीय विद्यालय संघटन तर्फे दरवर्षी केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांना एक अभ्यास दौरा करायचा असतो. यावर्षी केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या जळगाव येथील प्रिंटिंग प्रेसला अभ्यास भेट दिली. या अभ्यास भेटीमध्ये लोकमत वृत्तपत्र प्रिंटिंग प्रेस व्यवस्थापकांनी अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना वृत्तपत्राचा इतिहास समजावून सांगितला. त्याचप्रमाणे लोकमत वृत्तपत्राची सुरुवात त्याचा वाढ, विकास, प्रसार कसा संपूर्ण महाराष्ट्रभर होत गेला आणि आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नंबर १चे वृत्तपत्र म्हणून लोकमत काम करते आहे याबद्दल सविस्तर सांगितले. तद्नंतर प्रिंटिंग प्रेस मधील वेगवेगळे ऑटोमॅटिक वर्किंग कम्प्युटर्स, मशीन हे प्रात्यक्षिकासह काम करत असताना दाखविले. वृत्तपत्रासाठी वापरला जाणारा पेपर मागणी केल्यानंतर वृत्तपत्र प्रत्यक्षात प्रिंट होण्याअगोदर कोणकोणत्या प्रक्रिया कराव्या लागतात, त्यासाठीच्या प्लेट्स कशा तयार केल्या जातात आणि सर्वात शेवटी फायनल प्रिंट, वृत्तपत्र तयार कसा होतो हे सांगितले. साधारणतः एका दिवसाला पावणे दोन लाख वृत्तपत्र प्रिंट करण्याची क्षमता जळगाव येथील लोकमत वृत्तपत्र प्रिंटिंग प्रेस मध्ये आहे हे ही माहिती नवीन मिळाली. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदविला. नंतर लोकमत वृत्तपत्र प्रिंटिंग प्रेस व्यवस्थापका तर्फे सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना चहा देण्यात आला. या अभ्यास भेटीचे नियोजन केंद्रीय विद्यालयातील शिक्षक मिथुन ढिवरे, इ. एन. सातव, विनोद राठोड यांनी केले होते तर महिला शिक्षिका पियाली पुरोहित सुद्धा सोबत होत्या.