प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनाची सांगता ; वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी प्रयोग

चोपडा प्रतिनिधी / विनायक पाटील
आदिवासी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने अंधश्रद्धेला बळी पडतात.त्यातून त्यांची अनेकांची आर्थिक पिळवणूक होते अशा घटना आपण बऱ्याच वेळा समाजात पाहत असतो.परंतु विज्ञानवादी दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करता यावा यासाठी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,यावल अंतर्गत प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी अनुदानित आश्रमशाळा,पिंपळे ता.अमळनेर येथे संपन्न झाला. या प्रदर्शनात 17 शासकीय व 34 अनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व सर्जनशील उपकरणे सादर केली.उच्च प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक असे तीन गट तयार करून प्रकल्पातील चार बीटमधून प्रत्येक गटातील सर्वोत्तम तीन उपकरणांना प्रदर्शनासाठी निवडण्यात आले. या प्रदर्शनात अनुक्रमे 14,12 आणि 26 उपकरणांचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या हस्ते झाले.उद्घाटनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याचे महत्त्व पटवून दिले आणि प्रयोगशीलता व नाविन्यपूर्णतेला चालना देण्याचे आवाहन केले.त्यांनी जाहीर केले की, प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रो (ISRO) दौऱ्यावर नेले जाईल,जेणेकरून त्यांना अवकाश संशोधन क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व विज्ञानाच्या क्षेत्रातील आवड निर्माण करण्यावर भर दिला.
समारोप व बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान अनिल झोपे(प्राचार्य, डायट जळगाव) यांनी भूषवले.आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील नाविन्यपूर्णता, आत्मविश्वास व सर्जनशीलतेबद्दल कौतुक केले. त्यांनी सांगितले की,या प्रदर्शनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन दिले असून त्यांच्या आत्मविश्वासाने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने त्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा मिळेल प्रकल्प अधिकारी व शिक्षण विभागाने घेतलेल्या या पुढाकाराचे त्यांनी विशेष अभिनंदन केले व या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात प्रेरणा मिळेल, असे मत व्यक्त केले.
झोपे यांनी डायट जळगावच्या वतीने आदिवासी आश्रमशाळांसाठी शैक्षणिक मदत व सुधारणा यासाठी कायमस्वरूपी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यक्रमांचे सातत्य ठेवण्यावर भर देत या उपक्रमाचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी प्रोत्साहन दिले.
प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तीनही गटातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळांना स्टेट बँक ऑफ इंडिया,यावल यांच्या वतीने इन्सिनेटर भेट देण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धर्मेंद्र कुमार सिंग (क्षेत्रीय व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक जळगाव), राधेश्याम ताराचंद मूंगमुळे (शाखा व्यवस्थापक, यावल),डॉ. सी.डी.साळुंखे (ज्येष्ठ अधिव्याख्याता, डायट जळगाव), सौ. विद्याताई युवराज पाटील (अध्यक्ष, श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी, पिंपळे), युवराज दगाजीराव पाटील (सचिव,श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी, पिंपळे) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निरीक्षण व मूल्यांकन कार्य निरंजन पेंढारे (विज्ञान शिक्षक, माध्यमिक विद्यालय वावडे, तालुका अमळनेर),बी.बी.ठाकरे (विज्ञान शिक्षक,साने गुरुजी माध्यमिक विद्यालय,अमळनेर) व डी.के. पाटील (विज्ञान शिक्षक, जय योगेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय,अमळनेर) यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पवन पाटील (सहा. प्रकल्प अधिकारी,यावल) व इतर अधिकारी व कर्मचारी शिक्षण विभाग,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल व अनुदानित आश्रम शाळा,पिंपळे यांच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देत त्यांना सर्जनशीलतेसाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.