महाराष्ट्र

फुले-शाहू-आंबेडकर यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र साकार करूया ! पी.डी.पाटील सर

महाराष्ट्र दिन विशेष

कला, शिक्षण, चित्रपट, संगीत अशा विविध क्षेत्रांमध्ये सुद्धा महाराष्ट्राने उत्तुंग भरारी घेतली आहे. तसेच गेली कित्येक वर्ष जगाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाच्या धडपडी स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेला आपला महाराष्ट्र. दगडांचा ,मातीचा, डोंगरदऱ्यांच्या , नद्यांचा, विरांचा, कलावंतांचा, बुद्धीवंतांचा नानाविध कलाविष्कार यांचा, शास्त्रज्ञांचा, समाजसुधारकांचा आणि राजकारण्यांचा महाराष्ट्र. आज १ मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापनादिन . हा दिन मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरे करतात. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो . या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. १ मे १९६० साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्र दिना सोबतच हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. कामगारांना अल्प मजुरीच्या बदल्यात १२ – २४ तास लावून काम करून घेतले जात होते. या विरोधात सर्व कामगारांनी एकत्र आंदोलन केले . तेव्हापासून १ मे हा कामगार दिन म्हणून पाळण्यात येऊ लागला. महाराष्ट्राच्या धार्मिक सुधारणा ,सामाजिक सुधारणाचा इतिहास उल्लेखनीय आहे. महाराष्ट्र हा संतांच्या, महापुरुषांच्या पवित्र विचारांनी पावन झालेली भूमी आहे. महाराष्ट्राच्या मातीत जगतगुरू संत तुकाराम, संत नामदेव, संत सावता माळी यांसारख्या अनेक संत होऊन गेले . त्यांनी अनेक ओव्या ,भारुडे, श्लोक रचले आणि एक चांगला संदेश महाराष्ट्राला दिला .           

स्वराज्याचे निर्माते ज्यांनी अठरापगड जाती – बारा बलुतेदार लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले असे अद्वितीय राजे कुळवाडी भूषण – बहुजन प्रतिपालक – छत्रपती शिवराय आपल्या सर्वांचे आदर्श आहेत. आधुनिक भारताचे जनक सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले, विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात जनजागृतीचे काम केले. लेखक, कवी, साहित्यिक यांनी आपल्या लेखनातून महाराष्ट्राला चांगला संदेश दिला. अशी माणसे आपल्या महाराष्ट्र भूमीत जन्माला आली हे महाराष्ट्राचे मोठे भाग्य आहे .             

या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानाच्या पुढे व मराठी माणसाच्या आंदोलनांमुळे सरकारने नमते घेऊन १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली . मराठी भाषेला राजभाषेचा तर मुंबईला महाराष्ट्राची राजधानी म्हणून दर्जा मिळाला. यशवंतराव चव्हाण यांच्या हाती नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. तेव्हा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण म्हणाले की १ मे हा सोन्याचा दिवस १ मे १९६० हा मराठी भाषिकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस.             

राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने पुढाकार घेतला होता . महाराष्ट्र आपली ऐतिहासिक ,सांस्कृतिक, सामाजिक कार्यकर्तुत्वची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वराज्याचे संस्थापक राजे – बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय याच मातीत जन्मले आणि वाढले. त्यांनी संपूर्ण जगाला सर्वधर्मसमभावाची विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. त्यांच्या विचारांवर आजही महाराष्ट्र स्वाभिमानाने ताठ उभा आहे.             

आपल्या देशासाठी प्राण पणास लावणारे अनेक रत्ने महाराष्ट्रात चमकली. संत नामदेव , जगतगुरू संत तुकाराम,संत जनाबाई ,संत मीराबाई ,संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराजांच्या अश्या किती तरी संतांची मांदियाळी महाराष्ट्राच्या मानवी मनाला नवचेतना ऊर्जा देत गेली . त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील ,राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अशा अनेक समाज प्रबोधन समाजसुधारक व पत्रकारांनी आपल्या महाराष्ट्राची शान वाढवली. अनेक लेखकांनी तसेच अनेक कवींनी महाराष्ट्र मातीचा गोडवा गायला आहे .         

कवी कुसुमाग्रजांनी मराठी मातीची अवर्णनीय शब्दात वर्णन केले.” माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा. ” महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य ,कला, शिक्षण, क्रीडा ,संस्कृती, नाट्य, चित्रपट ,संगीत कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान असे विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे . आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार आपण करावयास हवा.           

आज महाराष्ट्रामध्ये जाती – जातीमध्ये, धर्मा – धर्मांमध्ये काही लोकं तेढ निर्माण करणाचा प्रयत्न होतोय, हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल. आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि खऱ्या अर्थाने आज देखील महापुरुषांच्या विचारांवर चालण्याची गरज आहे.           

चला तर मग महात्मा जोतीराव फुले – राजर्षी शाहू महाराज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नांचा महाराष्ट्र येणाऱ्या काळात आपण साकार करूया !…….         सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !……
▪️पी.डी.पाटील सर, महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव.📱९४०३७४६७५२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *