ताज्या बातम्या

मूल्य शिक्षणासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनची ; चारित्र्य निर्माण प्रदर्शनी व सापशिडी उपयुक्त

भाऊंच्या उद्यानात उदघाटन प्रसंगी मान्यवरांचे मत

जळगाव – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनने बाल मोहन ते युवा मोहन या महात्मा गांधीजींच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित केलेली चारित्र्य निर्माण प्रदर्शनी व सापशिडी मूल्य संस्काराच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे मत शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. संविधान दिनाच्या औचित्याने आजपासून भाऊंच्या उद्यानात प्रदर्शनीचे उदघाटन नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती चारुलता पाटील, सेवानिवृत्त कृषी अधिकारी दिलीप महाजन, वसुधा महाजन, रोहन फेगडे व आदित्य सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.कल्पक व नाविन्यपूर्ण पद्धतीने बनविलेले प्रदर्शन व सापशिडी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करतील असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवरांचे सुती हार देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षक व पालकांना, विद्यार्थ्यांना मूल्य संस्कार देण्यासाठी संस्थेच्यावतीने चारित्र्य निर्माण प्रदर्शनाची निर्मिती करण्यात आली आहे. यात सत्य, त्याग, समर्पण, कर्तव्य परायणता, बंधुभाव, क्षमाशीलता यासारख्या मूल्यांचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा गांधीजींच्या जीवनातील प्रसंगांचा चित्रकथेच्या माध्यमातून या प्रदर्शनाची निर्मिती करण्यात आली आहे. याच जीवन मूल्यांवर आधारित सापशिडीचा खेळही तयार करण्यात आला आहे. दररोज संध्याकाळी ५ ते ९ वेळेत भाऊंच्या उद्यानात हे प्रदर्शन खुले राहणार असून जळगावकर नागरिकांनी व शिक्षण संस्था चालकांनी आपल्या पाल्य, विद्यार्थ्यांसह या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.ज्या शैक्षणिक संस्थांना हि प्रदर्शनी व सापशिडीच्या माध्यमातून मूल्य संस्कार उपक्रम राबवावयाचा असेल त्यांनी गिरीश कुलकर्णी (समन्वयक, परीक्षा विभाग) यांचेशी संपर्क करावा असे कळविण्यात आले आहे. या प्रसंगी विश्वजित पाटील, सुरेश पाटील, मुकेश पाटील यांचेसह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *