ताज्या बातम्या

यवतमाळ – खैरी परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था: रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता

राळेगाव मारेगाव बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

राळेगाव तालुका प्रतिनिधी – विलास साखरकर

परिसरातील खैरी येथील गोटाडी ते खैरी या मुख्य मार्गावार तसेच सावित्री पिंपरी या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्याला सुरुवात झाली असतांना ग्रामिण भागातील बहुतांश रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. प्रशासन आज ना उद्या खड्डे बुजवेल , रस्त्याची दुरुस्ती करेल अशा अपेक्षेत नागरिक असतांना स्थानिक लोकप्रतिनीधी व प्रशासन मुग गिळून गप्प असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

काही महिन्या अगोदर खैरी ते गोटाडी या मार्गावरील खड्ड्यात मुरूम टाकून थातूर मातूर बुजविण्यात आले होते, पण या मार्गावर अवजड कोळसायाची वाहतूक सुरु आहे त्यामुळे टाकलेला भराव निघून गेला. त्या खड्ड्यात पूर्णतः पाणी साचून असून वाटसरू, दुचाकीस्वार, व इतर वाहनाना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच खैरी वरून वडकी कडे जाणाऱ्या रस्त्याला जोड रस्ता असलेला सावित्री पिंपरी ह्या रस्त्यावर गेल्या कित्येक वर्षापासून खड्डे पडून आहे मात्र त्या रस्त्यावरील खड्ड्यामध्ये आतापर्यंत साधा मुरूम सुद्धा टाकण्यात आलेला नाही व त्या रस्त्याची दुरुस्ती सुद्धा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता प्रशासन अपघाताची वाट बघत आहे का? एखादा अपघात झाल्यावरच रस्ता दुरुस्त करणार का असा प्रश्न खैरी सावित्री पिंपरी तसेच परिसरातील गावाकरी करीत आहे.

लाखो रुपयाचा निधी वापरून हे खड्डे बुजवले जातात खरे परंतु, दर पावसाळ्यात हे खड्डे व्यापक आकार घेतात त्यामुळे खड्डेयुक्त रस्त्या वरून वाहन चालवितांना दुचाकी – चारचाकी वाहन चालविताना वाहन चालकाला तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याची कामे करताना संबंधित ठेकेदाराला संबंधित बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचे व लोक प्रतिनीधीचे लाड पुरवावे लागतात. गब्बर वरकमाईची चटक लागल्यामुळेच थातुरमातुर कामे होऊन रस्तोरस्ती खड्ड्यांचे प्रमाण वाढले जाते. यातुनच रस्ते अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे दुर्दैवाने अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. परंतु डोळ्यावर गांधारीची पट्टी बांधलेल्या लोकप्रतिनिधींना व प्रशासनाला अद्यापही जाग आला नसून राजकीय पुढार्‍यांच्या कृपा आशीर्वादाने या गंभीर विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेत चर्चेला जात आहे. रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या पाचवीलाच पुजले की काय असा सवाल संतप्त नागरिक व्यक्त करीत आहेत. दरवर्षी रस्त्यावरील खड्ड्यासाठी बऱ्याच सामाजिक संघटना व राजकीय पक्ष कार्यकर्ते खडड्यात बेशरमाचे झाड लाऊन प्रतिकात्मक आंदोलन करतात. मात्र ठेकेदारांकडून मिळणाऱ्या गब्बर मिळकतीमुळे अधिकाऱ्यांवर राजकीय पुढाऱ्यांचे वरदहस्त असल्यामुळे ग्रामिण भागातील रस्त्यावरील खड्डे जैसे थे तसेच राहतात. याकडे लोकप्रतिनीधी व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालुन नागरीकांची रस्त्याची समस्या सोडवावी अशी मागणी होतं आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *