राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर जारी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी, विश्वास कुटे
पत्रकार परिषदेत आ.अमोल मिटकरी यांनी दिली माहिती : विविध विषयांवर गाजली पत्रकार परिषद
कारंजा ( लाड ) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा वाशिमच्या वतीने दि. ०८ सप्टेंबर रोजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालय पुंजानी कॉम्प्लेक्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला. तसेच ही पत्रकार परिषद विविध विषयांवर चांगलीच गाजली. महाराष्ट्रवादी हेल्पलाईन व जनसामान्यांच्या समस्या, माहिती आणि शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध महत्त्वकांक्षी कल्याणकारी योजनांची माहिती समाजाच्या सर्व घटकांना व्हावी तसेच कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नये या बाबींची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी दिली. या वेळी उपस्थित पत्रकारांनी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले. ज्या मध्ये मुस्लिम समाजाबद्दल रामगिरी महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य तसेच आ. नितेश राणे यांचे वक्तव्य या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका काय ? या वर बोलताना आमदार मिटकरी म्हणाले की, इस्लाम धर्मियांचे जे श्रद्धास्थान आहे. त्यांच्याबद्दल अपशब्द बोलताना या महाराजांनी विचार करायला हवा. त्यामुळे अशा महाराजांनी बोलत असताना विचार करून बोलावं. तसेच अशा महाराजांवर कायद्याचा वचक असावा. कुठल्याही धर्माची विटंबना होत असताना, कुठल्या ही धर्मीयांच्या भावना दुखवत असताना, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यांना हे चांगल्याने माहित असताना अशा प्रकारचे विधान करणे म्हणजे संन्यासाच्या वेशात गुंडागर्दी करण्याचा हा प्रकार असल्याची टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली. तसेच राणेंनी हिंदू धर्मात किती वेद, किती शास्त्र आणि किती पुराणं आहेत, याचं उत्तर दिलं तर त्यांना आपण खरं हिंदू समजू, असा टोलाही अमोल मिटकरींनी लगावला आहे. तसेच, महाराष्ट्रातील जनता नितेश राणेंना नेपाळमध्ये पाठवायला उत्सुक असल्याचे म्हणत खोचक टीकाही मिटकरी यांनी केली आहे. आयोजित पत्रकार परिषदेत रा.काँ.पा वाशिम जिल्हाध्यक्ष मो. युसूफ पुंजानी, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.