क्रिडा

राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेचे थाटात उद्घाटन

जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांची बुध्दिबळ पटावर यशस्वी चाल

जळगाव – अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय बुध्दिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. प्रेसिडेंट कॉटेज, अजिंठा रोड या रिसॉर्ट येथे हा सोहळा पार पडला. याप्रसंगी महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डाॕ. प्रविण मुंढे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदकुमार गादिया, आॕल इंडिया चेस असोसिएशनचे आॕरबिटर कमिटीचे चेअरमन धर्मेंद्र कुमार, रेटिंग ऑफिसर गोपाकुमार, महाराष्ट्र चेस असोसिएशचे सचिव निरंजन गोडबोले व्यासपिठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. तसेच बुध्दिबळ पटावर अभिजीत राऊत आणि डाॕ.प्रविण मुंढे यांनी पटावर चाल करून स्पर्धेची सुरूवात केली. प्रास्तविक करताना नंदलाल गादिया यांनी स्पर्धेबाबतची माहिती दिली. मंगेश गंभीरे यांनी सूत्रसंचालन केले. आभार जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे यांनी केले. महाराष्ट्रातील राष्ट्रीय खेळाडू नागपूरची दिव्या देशमुख, औरंगाबादची तनिषा बोरामणीकर, साक्षी चितलांगे, जळगावची भाग्यश्री पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारतोषिके देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पर्धेला शुभेच्छा देताना सांगितले की, कोणत्याही शहराची ओळख ही क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमांनी होते. या राष्ट्रीय स्तरावरील बुध्दीबळ स्पर्धेमुळे जळगावातील खेळाडूंना चांगले व्यासपिठ उपलब्ध झाले आहे. पोलीस अधिक्षक डाॕ. प्रविण मुंढे स्पर्धेच्या आयोजनाने जळगावची ओळख क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर होत असल्याने यासाठी सहकार्य करणारे अशोक जैन कौतुक केले. सचिव निरंजन गोडबोले राष्ट्रीय स्पर्धेसाठी अशोक जैन यांनी पाठबळ दिल्याने ती यशस्वी होत आहे. क्रीडा क्षेत्रासाठी अशोक जैन व अतुल जैन यांचे नेहमी सहकार्य लाभलेले असते त्यामुळेच मोठ्या स्वरूपातील कार्य पुर्ण होण्यास शक्य होते.जळगावातील या बुध्दिबळ स्पर्धेचे प्रायोजकत्व अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि.यांनी स्विकारले असुन ही स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे होत आहे. महिला गटात एकूण ११ संघ तर पुरूष गटात २२ संघ सहभागी आहे. पुरुष गटामध्ये एल आय सी ऑफ इंडिया, ऑल इंडिया रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स, सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड आर एस पी बी टीम, तामिळनाडू संघ, आंध्र संघ, बिहार, केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, भारतीय विमानतळ प्राधिकरण आदी संघांनी सहभाग निश्चित केला आहे. तर महिला गटामध्ये आंध्र, गुजरात, ओडिसा, बिहार, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्य संघ तर पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच संघ,भारतीय विमानतळ प्राधिकरणदेखील स्पर्धेत सहभागी असेल. भारतातील अग्रगण्य मोबाईल प्रिमीयर लिग फाउंडेशन (एम पी एल) व स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (अर्थात साई) या संस्था अखिल भारतीय बुध्दीबळ महासंघाशी करारबध्द असून देशभरातील सर्व स्पर्धांसाठी त्यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *