राहुरी | महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कार्यालयातून बाहेर काढण्याचे पाप करणाऱ्यांनी आंम्हाला अक्कल शिकवू नये – आप्पासाहेब ढूस
प्रतिनिधी आशिष संसारे, राहुरी
देवळाली नगरपालिकेत प्रशासक असेपर्यंत त्यांची खुर्ची व दालन वापरण्यास राजकीय पुढाऱ्यांना प्रतिबंध कारावा.प्रहार चे आप्पासाहेब ढूस यांची विभागीय आयुक्तांकडे तक्रार.. देवळाली प्रवरा नगरपरिषदे मध्ये जोपर्यंत शासन नियुक्त प्रशासक आहे तोपर्यंत प्रशासकांचे दालन व खुर्ची आणि कार्यालयातील सभागृह कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी वापरण्यास प्रतिबंध करावा अशी तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख अप्पासाहेब ढूस यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, आणि श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हंटले आहे. ढूस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवळाली प्रवरा नगरपरिषदेवर शासन नियुक्त प्रशासकीय अध्यक्ष म्हणून श्रीरामपूर येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब हे आज रोजी काम पाहत आहेत तथापी १९/१०/२०२३ रोजी सकाळी १०.५३ वाजता या प्रशासकीय अध्यक्षांच्या दालनातील प्रशासकांच्या खुर्चीवर बसून देवळाली प्रवरा येथील नागरिक श्री चंद्रशेखर लक्ष्मण कदम हे नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून नागरिकांचे समक्ष कामाचा आढावा घेऊन त्यांना सूचना वजा आदेश देताना आढळून आले आहेत. त्या घटनेचा जीपीएस लोकेशन सह व्हिडिओ आमच्याकडे पुरावा म्हणून ऊपलब्ध आहे.
या घटनेनंतर दिनांक २०/१०/२०२३ रोजी सोशल मीडियामध्ये स्वतःच्या बगलबच्चांच्या माध्यमातून संदेश फिरवून श्री चंद्रशेखर कदम यांनी पुन्हा मोठ्या संख्येने एका विशिष्ट गटाच्या राजकीय लोकांना सोबत घेऊन या दालनामध्ये नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची व नागरिकांची बैठक घेतली आहे तसेच याच दालनात पत्रकार परिषद घेऊन पत्रकार बांधवांना दिलेल्या व्हिडिओ मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, दर आठवड्याला नगरपरिषदे मध्ये येऊन अधिकारी आणि जनतेची संयुक्त बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे. तसेच झालेल्या या बैठकीचे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीची कात्रणे आणि सोशल मीडिया मधून आलेले व्हिडिओ सुद्धा पुरावा म्हणून आमच्याकडे उपलब्ध आहे .
त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ प्रसारित करून प्रशासकीय दालनातून इतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर आगपाखड करून राजकीय भाष्य केले आहे. त्याचा व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे प्रशासकांचे कार्यालय व नगरपरिषद इमारत ही या राजकीय लोकांचा खाजगी अड्डा झाला असून त्याला राजकीय आखाड्याचे स्वरूप आले असल्याचे जाणवते. नगरपरिषदेचे लोकनियुक्त सदस्य आणि नगराध्यक्ष यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर नगरपरिषद अधिनियमातील तरतुदीनुसार नगरपरिषदेवर प्रशासकांची नेमणूक होते. आणि अशी नेमणूक झाल्यावर प्रशासकांच्या त्या खुर्चीवर बसून तिथून कारभार हाकण्याचा अधिकार कोणत्याही राजकीय पक्षाला/ गटाला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना नाही. त्यामुळे आमचेसह इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना या प्रशासकांच्या खुर्चीवर तसेच दालनात समूहाने बसुन बैठका घेण्यासाठी किंवा कारभार पाहण्यासाठी तात्काळ मनाई करावी. त्या राजकीय व्यक्तींचे जे काही वैयक्तिक किंवा नागरिकांची कामे असतील तर ते त्यांनी प्रशासकांकडे जाऊन त्या कामाचा पाठपुरावा करावा त्यास आमचे दुमत नाही. परंतु प्रशासकांचे खुर्चीवर बसून मनमानी पद्धतीने कामगारांना सूचना व आदेश देणे, झुंडशाही करणे, लोकांना बाहेर प्रतीक्षेत ठेवणे, गर्दी जमून जनतेवर व कर्मचाऱ्यांवर धाक जमविनेचा प्रयत्न करणे याला प्रशासकांनी नगरपरिषद अधिनियमातील तरतुदीनुसार तात्काळ प्रतिबंध घालावा. देवळाली प्रवरा नगरपरिषद कार्यालय हे काही कोणाच्या घरची खाजगी मानवता नाही. किंवा, एखाद्या सोसायटीचे कार्यालय नाही. ज्यांना जनतेचे प्रश्न सोडविण्याची फारच उपरती झाली असेल त्यांनी स्वतःच्या राजकीय पक्षाच्या कार्यालयात जनतेला बोलावून त्यांचे प्रश्न सोडवावेत प्रशासक असेपर्यंत देवळाली प्रवरा नगरपरिषदेला कोणीही स्वतःचा राजकीय अड्डा बनवू नये. त्यास आमची हरकत आहे.
देवळाली प्रवरा हद्दीतील एका विशिष्ट पक्षाचे किंवा गटाचे नागरिक हे देवळाली प्रवारा नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रशासकीय अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून व त्यांचे कार्यकर्ते व बगलबच्चे यांचे समोर नगरपरिषदेचा कारभार पाहत असल्यासारखा प्रशासकांच्या दालनाचा व खुर्चीचा वापर करीत असल्याचे आढळून आल्याने हे जर असेच सुरू राहिले तर शहरातील इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी या खुर्चीवर येऊन बसू लागतील व स्वतःच्या पक्षाचा अजेंडा याच प्रशासकांच्या खुर्चीवर बसून दालनात चालू लागतील. त्यामुळे भविष्यात जो काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची कृपया नोंद घ्यावी.
सबब, जोपर्यंत लोकशाही पद्धतीने देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या पुढील निवडणुका होत नाहीत तोपर्यंत, प्रशासकांच्या खुर्चीचा कोणीही गैरवापर करू नये. तसेच कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने तिथे जाऊन राजकारण करण्यास प्रतिबंध करावा. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा वापर केवळ आणि केवळ जे शासन नियुक्त प्रशासक आहेत त्यांनाच त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे. बाकी इतर कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना त्या खुर्चीत बसण्यास प्रतिबंध करावा. आणि देवळाली प्रवरा नगरपरिषदे मध्ये जोपर्यंत प्रशासक आहे तोपर्यंत नगरपरिषदेचे कोणतेही कार्यालय हे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कोणत्याही पुढाऱ्यांनी वापरू नये. प्रशासकांच्या गैरहजेरीत प्रशासकांच्या दालनात, आवार व सभागृहात राजकीय मंडळींनी समूहाने बसण्यास किंवा बैठका घेण्यास सत्ता मनाई करावी. त्यासाठी आपले स्तरावरून संबंधितांना तात्काळ योग्य ते आदेश द्यावेत ही नम्र विनंती.
अन्यथा, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल किंवा आपले विरोधात योग्य त्या न्यायालयात दाद मागनेत येईल याची कृपया नोंद घ्यावी अशा पद्धतीने निवेदनाच्या शेवटी ढूस यांनी म्हंटले आहे.
प्रसंगी आप्पासाहेब ढूस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, काही मंडळी नगरपरिषदेला स्वतःची घरची मालमत्ता समजतात. व तेथून आमच्यावरती पाखर करताना म्हणतात की, जनतेने आम्हाला खूप वेळा सत्ता दिली, आम्ही आमदारकीचा त्याग केला.. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, आपण आमदारकीचा त्याग केला नाही. तर, आमदारकीचे तिकीट कितीला विकले हे जनतेला माहिती आहे, त्याचबरोबर आपल्याला जनतेने खूप वेळेस सत्ता दिली. तरीही देवळालीचे ५० वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न प्रहार जनशक्ती पक्षाला सोडविण्याची वेळ आली आहे. त्यामध्ये प्रसादनगरला पाण्याचे नळ कनेक्शन देण्यासाठी प्रहारला आंदोलन करावे लागले. व तेथे शंभर कुटुंबांना प्रहार ने नळ कनेक्शन मिळवून दिले आहेत. त्याचबरोबर देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दी मधून गेलेल्या भंडारदरा धरणाच्या कॅनॉलवर असलेल्या लोखंडी फुलांचा पन्नास वर्षे प्रलंबित प्रश्न प्रहारणे सोडविला. आणि, तब्बल चार ठिकाणी प्रहारणे लोखंडी पादचारी पुलाची व्यवस्था करून नागरिकांची सोय करून दिली आहे. एकीकडे तुम्ही म्हणता.. आम्हाला नागरिकांनी खूप सत्ता दिल्या, तर मग देवळाली प्रवरा शहरामध्ये उघड्यावर राहणाऱ्या अनाथ भगिनीला घर देण्याची वेळ प्रहार वरती यावी यातच तुमचा पन्नास वर्षाचा कार्यकाळ नागरिकांना सर्व काही सांगून जातो. दुसरीकडे काही बालिश मंडळी आमच्या नोकरीचा दाखला देऊन हे रजा टाकून कुठे फिरत होते म्हणून आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही जर त्या काळात चुकत होतो तर आम्हाला दंडीत करण्याचे तुमच्या हातात असताना तुम्ही का करू शकले नाहीत. उलट जेव्हा तुम्ही तुमच्या चुलत्याकडे नोकरी करत होता तेव्हा आम्ही देशासाठी सुवर्णपदक मिलविनेसाठी झगडत होतो. आणि जेव्हा नागरिकांनी मोठ्या विश्वासाने आपल्याला सत्ता दिली तेव्हा, नागरिकांच्या करातुन गोळा झालेला पैसा कचऱ्यामध्ये घातला. एकेकाळी तुमच्या मालमत्ताचा लिलाव निघाल्याची जाहिरात वृत्तपत्रांमधून आम्हाला वाचायला मिळाली होती.. पण सत्तेत येताच तुम्ही कचऱ्यामधून स्वतःची क्रांती केली आणि रातोरात कसे करोडपती झाले हे जनतेला सर्व माहिती आहे. त्याचबरोबर तुम्हाला सत्तेची इतकी मस्ती आली की, तुम्ही थेट महामानव भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो कार्यालयातून बाहेर काढण्याचे पाप केले आहे. त्यामुळे अशा मंडळींनी आम्हाला अक्कल शिकवू नये.
ज्यांना सध्या नगरपालिकेच्या निवडणुका जवळ येताना दिसताना नागरिकांच्या समस्यांची खूपच उपरती झाली आहे.. त्यांनीच देवळाली प्रवरा नगर परिषदेने मीटर द्वारे विकत घेतलेले मुळा धरणाचे पिण्याचे पाणी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अर्ध्या तालुक्याला २४ तास मोफत वाटण्याचे पाप केलेले आहे. त्या अर्ध्या तालुक्यातील अनधिकृत नळांची आणि वाया जाणाऱ्या पाण्याची समस्या मात्र यांना समस्या दिसत नाही. यातच यांचे गावाबद्दल असलेले पुतना मावशीचे प्रेम दिसून येते.
आमच्याकडे बोलण्यासारखे खूप काही आहे.. पण ते योग्य वेळ आल्यावर आम्ही बोलू.. तूर्तास प्रशासक असे पर्यन्त नगरपालिकेचा कुणी राजकीय आखाडा म्हणून वापर करू नये.