महाराष्ट्र

राहुरी | राहुरीतून वकील दाम्पत्य रहस्यमयरित्या गायब !

प्रतिनिधी | आशिष संसारे

राहुरी येथील न्यायालयातील आढाव नामक वकिल दाम्पत्य काल दुपार पासून अचानक रहस्यमय रित्या बेपत्ता झाल्याने वकिल संघटना तसेच तालूक्यात प्रचंड खळबळ उडाली. वकिल दाम्पत्यांचा शोध घेण्यासाठी राहुरी येथील पोलिस पथके रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. तर शहरासह तालूक्यात विविध चर्चा सुरु आहेत. ॲड.राजाराम जयवंत आढाव, वय ५२ वर्षे, तसेच ॲड. मनीषा राजाराम आढाव, वय ४२ वर्षे, हे वकिल दाम्पत्य राहुरी तालूक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती येथे राहत असून ते दोघेही राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. ॲड.राजाराम आढाव हे काल दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी दुपार पर्यंत राहुरी येथील न्यायालयात त्यांचे कामकाज करत होते. त्यानंतर दुपारी दोन वाजे दरम्यान ते अहमदनगर येथे गेले. त्यानंतर त्यांनी एका पक्षकाराला पाठवून त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव यांना बोलावून घेतले. अशी माहिती मिळाली आहे. तेव्हापासून आढाव हे दोघे पती पत्नी बेपत्ता आहेत. आज दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी पहाटे दोन वाजे ॲड. राजाराम आढाव यांची फियस्टा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एम एच १७ ए इ २३९० ही गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात बेवारस मिळून आली. पहाटे पोलिस पथक गाडी जवळ पोहचले तेव्हा त्यावेळी ॲड. आढाव यांच्या गाडी जवळ दुसरी एक डस्टर गाडी उभा होती. मात्र पोलिस गाडी आल्याचे पाहताच सदर डस्टर गाडी त्या ठिकाणाहून सुसाट वेगात निघून गेली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने ॲड. आढाव यांची चारचाकी गाडी ताब्यात घेतली. त्या गाडीची तपासणी केली असता गाडीत एक हातमोजा, दोर व एक बूट आढळून आला. तपासा दरम्यान पोलिस पथकाला आज दुपारी १२ वाजे दरम्यान आढाव यांची दुचाकी क्र. एम एच १७ ए डब्लू ३२०७ ही गाडी राहुरी येथील न्यायालयाच्या मागील परिसरात बेवारस मिळून आली. तसेच आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील आयसीआयसीआय बँके समोर बेवारस मिळून आले.

या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात आढाव दाम्पत्य बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. मात्र ॲड. राजाराम आढाव व ॲड. मनीषा आढाव यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटने बाबत वकिल संघटनेसह तालूक्यात विविध प्रकारची चर्चा सुरु आहे. दुपारी उशीरापर्यंत पोलिस पथक आढाव दाम्पत्यांचा शोध घेत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *