ताज्या बातम्या

राहुरी | वकील दांपत्याचे अपहरण करून निर्घृण खून ; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर दोन पसार

प्रतिनिधी | आशिष संसारे

आवघ्या २० हजार रुपयांच्या फी वरून पक्षकाराने निर्घृण खून केल्याची चर्चा…

राहुरी : पक्षकार आणि वकील यांच्यात अवघ्या २० हजार रुपयांच्या फी वरून वाद निर्माण झाला आणि पक्षकाराने वकील पती-पत्नीचा निर्घृण खून करून मृतदेह उंबरे येथील एका विहिरीमध्ये टाकून दिले.राहुरी तालुक्यामध्ये २५ जानेवारी २०२४ रोजी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने तालुक्यासह नगर जिल्हा हादरून गेला आहे.
ॲड.राजाराम जयवंत आढाव आणि ॲड.मनिषा राजाराम आढाव हे वकील दाम्पत्य राहुरी तालुक्यातील मनोरी येथील आढाव वस्ती येथे राहत आहेत ते दोघेही राहुरी येथील न्यायालयामध्ये वकील व्यवसाय करत होते.ॲड.राजाराम आढाव हे २५ जानेवारी रोजी दुपारपर्यंत राहुरी येथील न्यायालयामध्ये त्यांचे कामकाज करत होते.त्यानंतर दुपारी २ च्या दरम्यान ते अहमदनगर येथे गेले त्यानंतर त्यांनी एका पक्षकाराला पाठवून त्यांची पत्नी ॲड.मनीषा आढाव यांना बोलावून घेतलं अशी माहिती मिळत आहे.तेव्हापासून आढाव दाम्पत्य हे दोघे पती पत्नी बेपत्ता झाले होते.
२६ जानेवारी रोजी पहाटे २ वाजे दरम्यान ॲड.राजाराम आढाव यांची फियास्टा कंपनीची चारचाकी गाडी ही राहुरी शहरामधील न्यायालय परिसरात बेवारसरित्या आढळून आली. पोलीस पथक गाडीच्या जवळ पोहोचले त्यावेळी तिथे ॲड. आढाव यांच्या गाडीच्या जवळ दुसरी एक डस्टर गाडी उभी होती मात्र पोलिसांची गाडी आली हे पाहताच डस्टर गाडी त्या ठिकाणाहून सुसाट वेगाने निघून गेली.पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ॲड.आढाव यांची चारचाकी गाडी ताब्यात घेतली.त्या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये एक हातमोजा,दोर आणि एक बूट आढळून आला होता.तपासा दरम्यान पोलीस पथकाला दुपारी १२ वाजे दरम्यान आढाव यांची दुचाकी गाडी राहुरी येथील न्यायालयाच्या आवारात बेवारसरीत्या आढळून आली. तसेच आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील आयसीआयसीआय बँकेसमोर मिळून आले. घटनेनंतर अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व राहुरी पोलीस पथक आढाव दांपत्याचा शोध घेत होते.दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक तुषार धाकराव,हवालदार मनोज गोसावी,गणेश भिंगारदे तसेच रणजीत जाधव,रवींद्र कर्डिले,दत्तात्रय गव्हाणे,सागर ससाणे,संदीप पवार,अमृत आढाव,फुकरान शेख,प्रशांत राठोड,मेघराज कोल्हे,चंद्रकांत कुसळकर,संभाजी कोतकर आदी पोलिसांच्या पथकाने डस्टर गाडीचा शोध घेऊन उंबरे येथील किरण नामक आणि आणखी एक अशा दोन आरोपींना पथकानं ताब्यात घेतलं.त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी घटनेची संपूर्ण माहिती दिली.२५ जानेवारी रोजी दुपारी आढाव दाम्पत्याचे अपहरण करून त्यांच्या मानोरी येथील घरी ते घेऊन गेले तिथे त्यांनी दोघांचा खून करून रात्रीच्या दरम्यान दोघांचे मृतदेह दगड बांधून उंबरे येथील स्मशानभूमी मध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये टाकून दिले.
दरम्यान २६ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान पोलीस प्रशासनाने आढाव दाम्पत्याचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून ताब्यात घेतले आहेत.पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेने अहमदनगर जिल्हा हादरून गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *