यवतमाळ हादरले ! १३ वर्षीय बालिकेवर शेजाऱ्याकडून अत्याचार

सुनने के लिए यहां क्लिक करें

१९ आठवड्यांची गरोदर ; दिग्रस तालुक्यातील खळबळजनक घटना

दिग्रस/यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील कोळशी तांडा शिवारामध्ये एका १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर शेतात राहणाऱ्या एका नराधमाने जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित बालिका तब्बल १९ आठवड्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर हा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची डेहणी येथील रहिवासी असून तिचे कुटुंब सध्या कोळशी तांडा शिवारातील स्वतःच्या शेतात झोपडी करून राहते. पीडितेचे आई-वडील मजुरीसाठी गेल्यानंतर ती तिच्या लहान बहिणींना सांभाळत शेतात थांबायची. याचाच फायदा घेऊन शेजारी राहणारा संशयित आरोपी दिगांबर काळू जाधव याने २६ जानेवारी २०२६ रोजी पीडितेला “शेतात वानर आले आहेत, त्यांना हाकलून लावू” असे आमिष दाखवले. लहान बहिणींना मोबाईलवर कार्टून लावून देऊन पीडितेला त्याने शेताशेजारील जंगलात नेले. तेथे तिच्या असहायतेचा आणि अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.

​जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार

या कृत्याबाबत कोणाला काहीही सांगितल्यास पीडितेला आणि तिच्या आई-वडिलांना मारून जंगलात फेकून देण्याची धमकी आरोपीने दिली होती. या भीतीपोटी पीडितेने कोणाकडेही अवाक्षर काढले नाही. याचा गैरफायदा घेत आरोपी दिगांबर जाधव याने गेल्या काही महिन्यांत आई-वडील शेतात नसताना १० ते १५ वेळा पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला.

​पोटदुखीमुळे उघडकीस आला प्रकार

दोन दिवसांपूर्वी पीडित बालिकेचे अचानक पोट दुखू लागल्याने तिच्या आईने तिला प्राथमिक उपचारासाठी डेहणी येथील रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता, ही अवघ्या १३ वर्षे १० महिने वयाची मुलगी १९ आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आले. हा धक्कादायक प्रकार ऐकून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पीडितेने घडलेला सर्व आपबिती सांगितली.

​पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पीडितेची प्रकृती पाहता तिला तात्काळ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलीस ठाण्याच्या पथकाने यवतमाळ रुग्णालयात पोहोचून पीडितेचे आईच्या समक्ष बयाण नोंदवून घेतले. ​या फिर्यादीवरून आरोपी दिगांबर काळू जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ६४(२)(m), ६४(२)(l), ६५(१), ३५१(२), ३५१(३) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा – POCSO), २०१२ च्या कलम ४ आणि ६ अन्वये विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत गांभीर्याने करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें