जळगाव रुग्णालयात नाशिकच्या गृहलक्ष्मी संस्थेचा ३६ कोटींचा घोटाळा?

तक्रारीनंतर तीन महिने उलटले तरी कारवाई नाही; डॉ. सुनील बन्सी यांचा आरोप
जळगाव जिल्हा रुग्णालयातील विविध पुरवठा व कामकाजाशी संबंधित व्यवहारांमध्ये नाशिकस्थित गृहलक्ष्मी महिला औद्योगिक सहकारी संस्थेने मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा गंभीर आरोप सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बन्सी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह तक्रार दाखल केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
डॉ. बन्सी यांनी २० फेब्रुवारी २०२६ रोजी ई-मेलद्वारे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक, सहसंचालक (अर्थ प्रशासन), उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक परिमंडळ, जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला होता. संबंधित तक्रारीच्या प्रती त्यांनी विविध कार्यालयांमध्ये प्रत्यक्षही जमा केल्या असल्याचे सांगितले आहे.
तक्रारीनंतरही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने त्यांनी ६ मार्च, १८ मार्च आणि त्यानंतर पुन्हा स्मरणपत्रे पाठवून प्रकरणाचा पाठपुरावा केला. तसेच २८ मे २०२६ रोजी उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक परिमंडळ आणि विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडेही निवेदन सादर करण्यात आले.
डॉ. बन्सी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रारीची स्थिती जाणून घेतली असता, तक्रारीवर सविस्तर टिपणी करून ती उपसंचालकांकडे सादर करण्यात आल्याची माहिती मिळाली. मात्र त्यावर अंतिम निर्णय होऊन फाईल संबंधित विभागाकडे परत पाठविण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.
यानंतर उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांची भेट घेतली असता त्यांनी संबंधित फाईल मागवून त्यावर कारवाईसाठी नोंद केल्याचे दिसले, मात्र त्यानंतरही पुढील कार्यवाही झालेली नसल्याचा दावा डॉ. बन्सी यांनी केला आहे.
मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारीची फाईल अद्याप उपसंचालकांच्या ताब्यात असून ती संबंधित लिपिकाकडे न आल्यामुळे कारवाई प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. यावरून तक्रारीच्या चौकशी प्रक्रियेला विलंब होत असल्याचा आरोप डॉ. बन्सी यांनी केला आहे.
मे. गृहलक्ष्मी महिला औद्योगिक सहकारी संस्था, नांदूर (जि. नाशिक) यांच्याविरोधातील कथित ३६ कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या तक्रारीला जवळपास तीन महिने उलटूनही चौकशी सुरू न झाल्याने लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि आरोग्यमंत्री यांनी या प्रकरणात लक्ष घालून सखोल चौकशी करावी, अशी मागणी डॉ. बन्सी यांनी केली आहे.
(टीप : वरील वृत्तातील आरोप हे तक्रारदार डॉ. सुनील बन्सी यांनी केलेल्या तक्रारी व निवेदनांवर आधारित असून संबंधित संस्था अथवा अधिकाऱ्यांची बाजू प्राप्त झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.)


