जळगाव-वराड बु. येथील अंगणवाडीचा स्लॅब कोसळला ; अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणामुळे बालकांच्या जीवितास धोका
धरणगाव – तालुक्यातील वराड बुद्रुक येथील अंगणवाडीत छताचा स्लॅब कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. घटना घडली तेव्हा सुदैवाने बालक विद्यार्थी अंगणवाडीत नसल्याने मोठा अनर्थ टाळला आहे. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
अंगणवाडीच्या छतावर पाणी साचत असल्याने खालील बाजूस पाण्याचा निचरा होवून अंगणवाडी मधील चाटच सुमारे ५ ते ६ फुट व्यासाचा स्लॅबचा तुकडा कोसळुन पडला. सदर घटना दि. २० जुलै रोजी दुपारच्या वेळी घडली. सुदैवाने दुपारची वेळ असल्याने अंगणवाडी बंद होती. मात्र अंगणवाडी सुरु असतांना सदर घटना घडली असता मोठा अपघात होवून जीवित हानीची शक्यता नाकारता आली नसती. मात्र असे असतांना देखील या घटनेकडे अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
इतकेच नव्हे तर या संदर्भात ग्रामपंचायतीने अनेकदा अर्ज देऊनही कुणीही याकडे लक्ष दिले नाही. अजुनही बाजूच्या देखील अंगणवाडी वर्गाची तीच परिस्थिती आहे. अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. धरणगाव तालुक्यातील सर्व अंगणवाडी तपासून त्यांचे तांत्रिक परीक्षण करून योग्य त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात. .. अशी प्रतिक्रिया अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अमृत महाजन यांनी दिली आहे.
यासंदर्भात गट शिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
तांत्रिक तपासणी करावी
धरणगाव तालुक्यातील सर्व अंगणवाडी तपासून त्यांचे तांत्रिक परीक्षण करून योग्य त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात…. अमृत महाजन, अध्यक्ष, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन