अमळनेरात १ जुलै रोजी कोळी समाजाचा बिऱ्हाड मोर्चा व ठिय्या आंदोलन

चोपडा प्रतिनिधी विनायक पाटील
अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर करणार प्रसंगी आमरण उपोषण. तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी चोपडा व अमळनेर तालुक्यातील आदिवासी कोळी समाजबांधवांतर्फे दि. १ जुलै २०२४ (वार-सोमवार) रोजी स. ११ वाजेपासून अमळनेर येथील तिरंगा चौकापासून प्रांत कार्यालयापर्यंत भव्य बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार असून त्याच ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. याआधी येथील प्रांत कार्यालयातर्फे शेकडों जातप्रमाणपत्र दिलेले आहेत. मग आत्ताच का देत नाहीत ? याबाबतचे निवेदन अमळनेर प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना देण्यात आले. निवेदनात प्रांत कार्यालयाकडे जातप्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज सादर करताना सबळ पुरावे जोडलेले आहेत. त्यांची दोन वेळेस तपासणी व सुनावणीही झालेली आहे. अशा प्रलंबित व नवीन दाखल होणाऱ्या प्रकरण धारकांना तात्काळ टोकरेकोळीचे दाखले मिळाले पाहिजेत. तसेच संबंधित विभागाने आंदोलनकर्त्यांच्या आरोग्यासह निवास, भोजन व शौचालयाची व्यवस्था करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील, विद्यमान खासदार श्रीमती. स्मिताताई वाघ, माजी आमदार, तहसिलदार, पोलीस अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. निवेदनावर प्रमुख आंदोलनकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.याप्रसंगी अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर जेष्ठ समाजसेवक मधुकरगुरु सोनवणे (अमळनेर), चोपडा सुतगिरणीचे संचालक कैलास बाविस्कर यांचेसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
