ताज्या बातम्या

जळगांव – स्वच्छ, सुंदर, हरित जळगावासाठी सज्जनशक्तीचा दृढ संकल्प ; गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या उपक्रमाला शैक्षणिक व स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवकांचा प्रतिसाद

जळगाव दि.२३ प्रतिनिधी –  स्वच्छता दूत, आठवड्यातून किमान एक तास स्वच्छतेसाठी, आपल्या परिसरातील विधायक काम करण्याऱ्या पाच व्यक्तींचे जनजागृतीसाठी एकत्रीकरण, स्वच्छता अभियान राबविणे, परिसरातील नागरिकांचे प्रबोधन, यातून जळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी सर्वसमावेशक विचार करण्याचा दृढ संकल्प आज जळगावातील सज्जनशक्तींने केला.महात्मा गांधीजीप्रमाणेच स्वच्छतेचा प्रचार प्रसार करणाऱ्या कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या 146 व्या जयंतीनिमित्ताने गांधी रिसर्च फाऊंडेशनने आयोजित केलेल्या स्वच्छ जळगाव… सुंदर जळगाव… हरित जळगाव  संकल्पना साकार करण्यासाठीची प्राथमिकस्तरावरील बैठक गांधीतीर्थ येथे आज संपन्न झाली. याप्रसंगी विविध शाळा, महाविद्यालयांमधील स्काऊट, एनएसएस, एनसीसी तसेच सामाजिक संस्था व सामाजिक कार्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी अशा ६० च्यावर स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक तथा गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार यांची प्रमुख मार्गदर्शन केले.शहराच्या विकासात, सौंदर्यीकरणात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो या दृष्टीने गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे प्रस्ताव मांडण्यात आले. यात प्रत्येकाने स्वच्छता दूत या भूमिकेतून किमान एक वर्ष जोडावे, आठवड्यातील किमान एक  तास स्वच्छता विषयासाठी द्यावा. आपल्या परिसरातील किमान पाच व्यक्तींचा एक समूह तयार करून पुढील तीन महिन्यात घरापर्यंत स्वच्छतेविषयी प्रबोधन करावे. नगरसेवकांच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचारी यांचेकडून स्वच्छता करून घ्यावी. परिसरातील प्लास्टिक कचरा एकत्रित गोळा करण्यासाठी एक दिवस उपक्रम राबविणे.  ज्या भागात स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे, असे भाग शोधून त्या भागातील नागरिकांना प्रोत्साहनाच्या दृष्टीने एकत्रिकरण करणे असे प्रस्ताव ठेवण्यात आले. यावर साधक बाधक चर्चा होऊन सकारात्मकेतसह स्वच्छ जळगाव, सुंदर जळगाव, हरित जळगाव करण्यावर रूपरेषा ठरविण्यात आली.गांधी रिसर्च फाऊंडेशन विधायक काम करित असताना समन्वयकाच्या भूमिकेत राहिल. वृक्षारोपणासह संवर्धन करत असतानाच स्वच्छतेच्या दृष्टीने जळगावात आज स्थिती काय आहे. समस्या कुठे आहेत, त्यावर उपाय करण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार झाला पाहिजे जेणे करून समस्येवर योग्य तोडगा काढता येईल. त्यादृष्टीने शाळा महाविद्यालयांपासून सामाजिक संस्था, व्यक्तींनी काम केले पाहिजे. आपला परिसर स्वच्छ करत असतानाच कचऱ्याचे योग्य विल्हेवाट लावावी. कुठेलेही अभियान राबविताना आरोग्याच्या दृष्टीने सजग राहिले पाहिजे. त्याबाबत जागरूकता करावी आपला वेळ देत असताना नागरिकांचा वेळ कसा विधायक कामांमध्ये लागेल यासाठी प्रयत्न करावे. विधायक कामातून प्रशासनावर चांगले काम करण्यासाठी दबाव आणला पाहिजे असे मार्गदर्शन डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले.समाज व प्रशासन एकत्र येणार नाही तोपर्यंत जळगाव सुंदर होणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ओला सुका कचरा वेगळा असेल तरच घ्यावा. सेवा नाही तर आपण स्वच्छतेची सवय लावू, कचऱ्याला कचरा म्हणून बघितले नाही तोपर्यंत स्वच्छता मोहिम यशस्वी होणार नाही. स्वच्छ वर्ग ही संकल्पना राबविण्याबाबतच्या सुचना उपस्थितांनी केल्या.यावेळी बैठकीत प्रामुख्याने गांधी रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. अश्विन झाला, गिरीष कुळकर्णी, सुधीर पाटील, निवृत्त वनाधिकारी पी. आर. पाटील, आय. एस. रितापूरे, एनसीसीचे गोविंद पवार, डॉ. महेंद्र काबरा, वसीम पटेल,  दुर्गादास मोरे, राजेंद्र खोरखेडे, मुकेश कुरील, जैन इरिगेशनचे देवेंद्र पाटील, मदन लाठी यासह शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी व सामाजीक कार्यकर्ते आदी उपस्थीत होते. प्रास्ताविक व संचालन गिरीष कुळकर्णी यांनी तर आभार हेमंत बेलसरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *