ताज्या बातम्या

जळगांव : हळद पिकातून मिळेल आर्थिक समृद्धीचा मार्ग – डॉ. निर्मल बाबू

जळगाव दि.१६ प्रतिनिधी – औषधी व प्रसाधन उद्योगांमध्ये हळदीला खूप महत्त्व आहे. कोरोनासारख्या काळात घसा, खोकला, कफसाठी हळद सह अन्य मसाल्यांची पदार्थ गुणकारी ठरल्याचे आपण बघितले आहेच. महाराष्ट्रातील जमिनीचा पोत पाहिला असता बेड पद्धत आणि जैन ठिबकसह, काटेकोर पाणी व खतं व्यवस्थापनातून सेलम सह अन्य लोकप्रिय हळदीच्या वाणांचे उत्पादन घेता येऊ शकते. हमी भावाच्या करार शेतीतून प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीचा मार्ग मिळेल असा विश्वास केरळच्या आयसीएआर आयआयएसआरचे स्पाईस संशोधन विभागाचे माजी संचालक डॉ. निर्मल बाबू यांनी व्यक्त केला.
जैन हिल्सवर सुरू असलेल्या शेतकरी अभ्यास दौरानिमित्त डॉ. निर्मल बाबू शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांच्यासोबत जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, कृषी संशोधन प्रात्यक्षिक विभागाचे संजय सोनजे यांची उपस्थिती होती. जैन इरिगेशनच्या कृषी संशोधन प्रात्यक्षिक विकास केंद्रावर देशभरातील १९ हळदीच्या जातींचे उत्पादन घेण्यात आले. यामध्ये कान्हदेशातील लोकप्रिय सेलम यासह मेघा, राजेंद्र सोनाली, राजेंद्र सोनीया, पितांबर, सिक्कीम लोकल यांचा समावेश आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन या आरोग्यादृष्ट्या महत्त्वाचा गुणधर्म असलेला घटक असतो. त्याचे प्रमाण कान्हदेशातील जास्त प्रमाणात लावली जाणारी व्हरायटी सेलम यात दिसतो. जैन हिल्स वरील संशोधन प्रात्यक्षिक केंद्रामध्ये बेड, वाफसा पद्धत, मल्चिंगचा वापर, यासह दोन ड्रीप लाईन द्वारे सिंचन दिले गेले. यातून योग्य वेळी पाण्याचा ताण देऊन फर्टिगेशन यंत्रणेद्वारे खते देता आली. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी जवळपास एकरी प्रति २२ ते २३ टन उत्पादन घेतल्याचे डॉ. निर्मला बाबू म्हणाले. उच्च दर्जाच्या हळदीला जगात खूप मागणी आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. योग्य व्यवस्थापनातून हळदीच्या कंद जवळपास एक ते दोन किलोचा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वात आधी चांगली रोपांची लागवड करावी यातून लागवडीचा खर्चही कमी होईल. त्यामुळे गुणवत्तापूर्ण रोपांचा आग्रह शेतकऱ्यांनी धरावा असे सांगत जैन हिल्स येथेही व्हायरस फ्री रोपे मागणीनुसार तयार केली जात असल्याचेही डॉ. निर्मला बाबू म्हणाले. स्मृती भ्रंश, कर्करोगसह अन्य आजारांवर हळद गुणकारी असल्याचे अनेक निष्कर्य समोर आले आहेत. यासह अन्य महत्त्वांमुळे हळद सह मसाल्यांची अन्य पिकाला जागतीक मागणी वाढत आहे. असे असताना जैन इरिगेशनच्या पांढरा कांदा करार शेतीच्या धर्तीवर करार शेती करून उत्पन्न घेऊन महाराष्ट्र मुख्य पुरवठादार म्हणून आणखी पुढे येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करीत कीडनियंत्रणासह अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर टाळून, हळद पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे असे आवाहनही यावेळी डॉ. निर्मला बाबू यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *