ताज्या बातम्या

मराठे परिवाराने सामाजिक प्रबोधनातून केले कन्या जन्माचे स्वागत

शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर म्हणजेच न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ; सत्यपाल महाराज

धरणगाव : येथील सु.क्ष.म.समाजाचे संचालक बबलू भगवान मराठे यांची कन्या रेणुका हिच्या नामकरण सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय समाज प्रबोधनकार तथा सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करून समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श घालून दिला.

             याबाबत सविस्तर असे की, काल दि. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री बजरंग चौक येथे राष्ट्रीय समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरवातीला बहुजन महापुरुष आणि महामातांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण सत्यपाल महाराज व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. भगवान भिवसन मराठे आणि त्यांच्या सर्व परिवाराने महाराजांचा शाल, गुच्छ देऊन सत्कार केला. किशोर पवार यांनी उपस्थित मान्यवरांच्या शब्दसुमनांनी स्वागत केले. प्रास्ताविकात सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील यांनी सांगितले की, बबलू मराठे व त्यांच्या सर्व परिवाराने घरातील पहिल्या कन्येच्या जन्माचे स्वागत प्रबोधनपर कार्यक्रमाने केले. ज्यांच्या माध्यमातून आज प्रबोधन होणार आहे ते निष्काम कर्मयोगी म्हणजेच राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज. ‘मढे झाकुनी करिती पेरणी, ही जात कुणब्याची’ जगद्गुरु तुकोबांच्या या उक्तीला सार्थ ठरविणारे सत्यपाल महाराज म्हणजे बोलके नाही तर कर्ते सुधारक असल्याचे श्री.पाटील सरांनी सांगितले.

              सत्यपाल महाराजांचे कीर्तन म्हणजे निद्रिस्त समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा कार्यक्रम असतो, हे काल महाराजांनी पुन्हा एकदा सिध्द केले. अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, जातीभेद, ग्रामस्वच्छता, शिक्षण, आरोग्य, अस्पृश्यता, विषमता, अत्याचार, अमानवी प्रथा, महागाई, बेरोजगारी, नीतिमूल्ये, संस्कार, सामाजिक विषमता अशा विविध विषयांना हात घालून त.गौतम बुद्ध, सम्राट अशोक, संत रविदास, कबीर, महाराणा प्रताप, संत ज्ञानेश्वर, नामदेवराय, तुकोबाराय, जिजाऊ, शिवराय, अहिल्यामाई, महात्मा फुले, सावित्रीमाई, राजर्षी शाहूजी, माता भिमाई, रमाई, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज या सर्व महान विभूतींच्या विचारांना साद घालण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे आपल्या समाजाचे अधोगतीचे मूळ येथील धर्मव्यवस्था, वर्ण-जातिप्रधान स्थितिशील समाज, कालबाह्य रूढी परंपरा, अंधश्रद्धा आणि पारंपरिक मानसिकता आहे. प्रत्येकाला प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पडायला पाहिजे, आणि प्रत्येकाला नोकरी मिळेलच या आशेवर न राहता ज्यांना जो उद्योग व्यवसाय करता येईल तो करा. हे सर्व बदल घडविण्यासाठी आत्ममंथन, आत्मपरीक्षण करणे काळाची गरज आहे. 

      आजपावेतो १४ हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम करून आणि वयाच्या ७१ व्या वर्षी देखील तोच उत्साह आणि स्फूर्ती टिकवून समाजजागृती करण्याचं कार्य महाराज करीत आहे. कार्यक्रम प्रसंगी अनेक महिला भगिनींना साड्या देऊन सन्मान, विद्यार्थांना रोख रक्कम तसेच पुस्तक देऊन सत्कार, समाजातील मार्ग चुकलेल्या युवकांना दाखवलेला सन्मार्ग, हास्य आणि भावनिकता, महापुरुषांचे विचार आणि समता, राष्ट्रहिताच्या अभिनव संकल्पना इ. वैशिष्ट्ये कालच्या प्रबोधनपर कार्यक्रमाची ठळकपणे सांगता येतील. कार्यक्रमप्रसंगी शिवसेनेचे गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, भाजपचे ॲड. संजय महाजन, राष्ट्रवादीचे निलेश चौधरी, चर्मकार संघाचे भानुदास विसावे, पत्रकार संघाचे ॲड.व्ही.एस.भोलाणे, धर्मराज मोरे, बी.आर.महाजन, निलेश पवार, जितेंद्र महाजन, अविनाश बाविस्कर, ॲड.हर्षल चौहाण, पी.डी.पाटील, सतिष शिंदे, राजेंद्र वाघ, यासह परिसरातील असंख्य बंधू,भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *